
सरकारी राशनच्या दुकानात मिळणाऱ्या तांदळामध्ये प्लास्टिक किंवा फायबरयुक्त बनावट तांदुळ मिसळून दिले जाते आहेत, अशी अफवा गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात पसरत आहे. परिणामी ग्राहक सरकारी राशनच्या दुकानातून तांदुळ घेण्यासाठी नकार देत आहेत.
या अफवांची सुरुवात कुठून झाली आणि सरकार असे वेगळे तांदुळ का देत आहेत, तसेच हा तांदुळ आरोग्यास हनिकारक आहे का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेऊया.
अफवांची सुरुवात
गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, चीन भारतात प्लास्टिकच्या तांदुळाचा पुरवठा करत आहे.

मूळ पोस्ट – झी न्यूज
पुढे कोरोना काळामध्ये पालघरातील सरकारी शाळेत दिला जाणारा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरीच वाटप केला गेला. परंतु पालकांनी तो आहार शाळेला परत केला, कारण “तांदुळ भेसळ युक्त असून ते निवडतांना त्यात मोठे, पिवळसर रंगाचे आणि वजणाला हलके असे तांदळाचे दाणे आढळले. हा तांदुळ पाण्यात टाकला की, काही वेळात विरघळतो. तसेच या तांदळाला जाळते तर हे पेट घेत नाही. सरकार शाळेच्या मार्फत विद्यार्थांना भेसळ युक्त तांदुळ देऊन त्यांचे आरोग्य धोक्यात टाकत आहे,” असे पालकांचे म्हणने होते.

मूळ पोस्ट – टीव्ही9 मराठी
सरकारने खंडन केले
या प्रकरणानंतर भारतीय खाद्य महामंडळाने स्पष्ट केले की, हा तांदुळ प्लास्टिकयुक्त नसून ‘फोर्टीफाइड’ (पोषणयुक्त) तांदुळ आहे.
या तांदळाबद्दल पालकांच्या मनात मोठा संभ्रम निर्माण झाल्यानंतर जिल्हा पोषण अभियान कार्यालयाने स्थानिक स्तरावर शाळांना व गटशिक्षणाधिकाऱ्यांना जनजागृती करण्याबाबतच्या सूचनाही दिल्या.

मूळ पोस्ट – लोकसत्ता
फोर्टीफाईड तांदळात कोणते तत्व आहेत ?
साधा तांदुळामध्ये एक किलो प्रमाणे 10 ग्रॅम फोर्टिफाइड तांदूळ मिसळले जाते.
फोर्टिफाइड तांदूळ पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये लोह, फॉलिक ऍसिड, झिंक ऑक्साईड तसेच जीवनसत्व अ, ब 12, बी 2, बी 3, बी 6 इत्यादी पोषक घटकांचा समावेश असतो.
फोर्टिफाइड तांदूळ कसा तयार केला जातो ?
सर्वप्रथम सामान्य तांदळाला बारीक करून त्याचे पीठ बनवले जाते. त्यानंतर या पिठामध्ये सर्व पोषक घटक मिरळले जातात. पाणी आणि तंत्राच्या साह्याने त्या पिठाला तांदळाच्या आकाराचे रुप दिले जाते. सर्व परीक्षणांवर खरे उतरल्यावर हे पौष्टिक तांदुळ सामान्य तांदळात ठराविक प्रमाणात मिसळले जातात.
सरकारी योजनांमध्ये फोर्टिफाइड तांदुळ
भारत सरकारद्वारे अन्न सुरक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या आंगनवाडी, मिड-डे मिल, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांमध्ये फोर्टिफाइड तांदूळाचा समावेश केला गेला आहे.
तसेच महाराष्ट्रामध्ये अंत्योदय योजनेतील कार्ड धारकांना ऑक्टोबर 2023 पासून तर प्राधान्य कुटुंब कार्ड (पिवळे राशन कार्ड) असणाऱ्यांना आता डिसेंबर पासून फोर्टीफाइड तांदुळ दिला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी आपण अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
लोकांच्या मनात संभ्रम का ?
फोर्टीफाइड तांदुळाच्या योजनांमध्ये समाविष्ट करण्याचा सरकारचा उद्देश विद्यार्थी, महिला आणि गरीब वर्गाला पौष्टिक आहार देण्याचा होता.
कोणती ही योजना अंमलात आणताना त्यांची जनजागृती करणे महत्वाचे ठरते. परंतु, या ठिकाणी फोर्टीफाइड तांदुळाचे महत्त्व समजवण्यात शासन आणि शासकीय यंत्रना कमी पडल्याचे दिसून येते. या कारणांमुळे लोकांच्या मनात अद्यापही फोर्टीफाइड तांदळाबद्दल संभ्रम कायम आहे.
भेसळ युक्त अन्नाची तक्रार
आपल्याला कोणत्याही कारखाण्यात, अन्नात भेस किंवा सार्वजनिक किंवा शसकीय ठिकाणी अस्वच्छता आढळली तर आपण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या 1800-222-365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.
या पूर्वीदेखील फॅक्ट क्रेसेंडोने प्लास्टिकचे तांदुळ आणि गहूच्या अफवांचे खंडण केले आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राशनच्या दुकानात प्लास्टिकयुक्त तांदुळ दिले जात नाही; फोर्टीफाइड बद्दल संभ्रम कायम
Written By: Sagar RawateResult: Insight
