2022 मधील व्हिडिओ पाकिस्तानी जाफर एक्सप्रेस अपहरणाचा म्हणून व्हायरल

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

बलुचिस्तान लिबरल आर्मीने 11 मार्च रोजी पाकिस्तानात पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करुन प्रवाशांना ओलीस धरले आहे.

याच पार्श्वभूमीवर ट्रेन ब्लास्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बलुचिस्तान लिबरेशन आर्मीद्वारे पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेसचे अपहरण करतानाचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपासून माध्यामांवर उपलब्ध आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक ट्रेन ब्लास्ट होताना दिसते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इस्लामाबाद, ११ मार्च – पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या विद्रोही गटाने जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले आहे. ही गाडी क्वेटा येथून पेशावरला जात असताना विद्रोह्यांनी रेल्वे मार्गावर आयईडी (IED) स्फोट घडवून तिला अडवले. त्यानंतर त्यांनी ताबडतोब ट्रेनवर हल्ला करत 182 प्रवाशांना ओलीस धरले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2022 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

रोहन पंचीगर नामक युजरने 15 एप्रिल 2022 रोजी हाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “बीएलएने बलुचिस्तानमधील सिब्बीजवळ एफसीला (फ्रंटियर कॉर्प्स) घेऊन जाणाऱ्या ट्रेनवर झालेल्या आयईडी हल्ल्याचे फुटेज प्रसिद्ध केले आहे.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

न्यूज-9 प्लसने 12 सप्टेंबर 2022 रोजी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 00:05 सेकंदावर व्हायरल व्हिडिओमधील क्लिप दिसते.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पाकिस्तान त्यांच्या सर्वात मोठ्या प्रांत बलुचिस्तानवर अत्यंत कडक कारवाई करत आहे. त्यांच्या आक्रमक धोरणांमुळे या प्रदेशात हिंसक प्रतिकार निर्माण झाला आहे.”

अर्थात व्हायरल व्हिडिओ बलुचिस्तान लिबरल आर्मीद्वारे जाफर एक्सप्रेसच्या अपहरणाच्या 3 वर्षांपूर्वीचा आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे. ट्रेन ब्लास्टचा हा व्हिडिओ 2022 पासून माध्यमांवर उपलब्ध आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:2022 मधील व्हिडिओ पाकिस्तानी जाफर एक्सप्रेस अपहरणाचा म्हणून व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Misleading