नेपाळने भ्रष्टाचार नोंदणीसाठी जारी केलेला हेल्पलाइन नंबर भारताच्या नावाने व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

भारत सरकारने नागरिकांना भ्रष्टाचार किंवा प्रशासनिक समस्या नोंदविण्यासाठी नवीन हेल्पलाइन नंबर 9851145045 सुरू केला, असा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल मेसेजमधील हेल्पलाइन नंबर भारत सरकारने जारी केलेला नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले की, प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयाने (PMO) स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करण्यासाठी नवीन हेल्पलाइन नंबर 9851145045 सुरू केला आहे. नागरिक आता या नंबरवरून भ्रष्टाचार किंवा प्रशासनिक समस्या नोंदवू शकतात.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर भारत सरकारने असा कोणताही हेल्पलाइन नंबर जारी केल्याचे अधिकृत माध्यमांवर आढळले नाही.

पुढे सर्चमध्ये नेपाळच्या रिपव्लिक वृत्ताने 20 सप्टेंबर रोजी एक बातमी शेअर केल्याचे आढळले. ज्यामध्ये नेपाळ सरकारने तेथील नागरिकांसाठी एक विशेष हेल्पलाइन क्रमांक 9851145045 सुरू केल्याचे सांगितले आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिक आता सरकारी सेवांबाबतच्या तक्रारी थेट नोंदवू शकतात. 

आर्काइव्ह

नेपाळ टेलिकॉमच्या (आर्काइव्ह) बातमीनुसार, नेपाळच्या पंतप्रधान सुषिला कार्की यांच्या नेतृत्वाखाली सरकारने “हॅलो गव्हर्नमेंट” उपक्रमाअंतर्गत सरकारी सेवांबाबत नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी 20 सप्टेंबर रोजी एक हेल्पलाइन क्रमांक जारी केला. हा हेल्पलाइन क्रमांक 9851145045 असून नेपाळ टेलिकॉमच्या पोस्टपेड सेवेद्वारे उपलब्ध होईल.

नेपाळ सरकारने ही हेल्पलाइन सामान्य नागरिकांना सरकारी कार्यालयांतील विलंब, भ्रष्टाचार, लाचखोरी, अनावश्यक त्रास किंवा अन्य कोणत्याही गैरप्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यासाथी जारी केली आहे.

शासनाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवणे, तसेच नागरिकांचा विश्वास निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

नेपाळ सरकार स्पष्ट

नेपाळ पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवर ‘संपर्क’ विभागात हाच नंबर शेअर करत स्पष्ट केले आहे की, “हे पेज नागरिकांच्या तक्रारी आणि सूचना नोंदवण्यासाठी खास तयार केलेले आहे.” 

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल मेसेजमध्ये दिलेला हेल्पलाइन नंबर भारतातील नाही, तर नेपाळ सरकारने जारी केला होता. भ्रामक दाव्यासह मेसेज व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नेपाळने भ्रष्टाचार नोंदणीसाठी जारी केलेला हेल्पलाइन नंबर भारताच्या नावाने व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Misleading


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *