
बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारात दीपू चंद्र दास या युवकाची जमावाद्वारे निर्घृण हत्या करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये बांगलादेशी पोलिस एका व्यक्तीला घेऊन जाताना दिसतात.
दावा केला जात आहे की, “बांगलादेशात मारल्या गेलेल्या दीपू चंद्र दासचा हा शेवटचा व्हिडिओ असून तो हात जोडून रडताना दिसतो, कारण पोलिसांनी त्याला जमावाच्या ताब्यात दिले होते.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दीपू चंद्र दास नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पोलिस एक युवकाला पकडून घेऊन जातात आणि तो व्यक्ती गयावया करायला लागतो.
व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “बांगलादेशात मारल्या गेलेल्या दीपू चंद्र दासचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तो हात जोडून रडताना दिसतो, कारण पोलिसांनी त्याला जमावाच्या ताब्यात देऊन मारण्यासाठी सोपवत आहे.”
युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बांगलादेश मधील जिहाद्यांकडून मारला गेलेला दिपू चंद्र दास याचा शेवटचा व्हिडिओ.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दिपू चंद्र दास नाही.
भोरेर कागोज लाईव्ह या अधिकृत बांगलादेशी न्यूज आउटलेटने हाच व्हिडिओ 18 नोव्हेंबर 2025 रोजी यूट्यूब चॅनेलवर शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये व्हिडिओमधील व्यक्ती ढाका कॉलेजचा एक विद्यार्थी असल्याचे सांगण्यात आले आहे.
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर याच घटनेचा एक सविस्तर व्हिडिओ एनपीबी न्यूज शेअर केल्याचे आढळले.
यामध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने एक टी-शर्ट घातलेले असून त्यावर ढाका कॉलेजचा लोगो आणि ‘मोमिन’ नाव दिसते.
तो व्यक्ती बंगाली भाषेत पोलिस अधिकाऱ्यांना सांगतो की, माझे नाव अब्दुल मोमिन असून मी ढाका कॉलेजचा विद्यार्थी आहे. तसेच माझा कोणत्याही आंदोलनाशी संबंध नाही.
तसेच दुसरा व्यक्तीही ‘आम्ही कॅम्पसमधील विद्यार्थी असल्याचे पोलिसांना सांगितल्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले.
https://www.facebook.com/reel/1HcqpxFmmE
बांगलादेशमध्ये हिंसक वातावरण का ?
भोरेर कागोजच्या वृत्तानुसार ढाक्यातील धनमंडी 32 परिसरात 17 नोव्हेंबर रोजी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संबंधित मानवतेविरोधी गुन्ह्याच्या प्रकरणातील निकालावरून पोलिस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली होती.
बांगलादेशमधील तरुणाची हत्या
बांगलादेशमधील मैमनसिंह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका हिंदू तरुणाची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून पेटवून देण्यात आला. या अमानवीय घटनेमुळे जगभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दीपू चंद्र दास असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी ढाका येथील रॅपिड अॅक्शन बटालियनने एकूण सात जणांना अटक केली आहे. अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती दीपू चंद्र दास नाही. मुळात हा अब्दुल मोमिन नामक या ढाका कॉलेज विद्यार्थी असून पोलिसांनी त्याला आंदोलक म्हणून पकडले होते. परंतु, गैरसमज दुर झाल्यावर त्याला सोडण्यात आले. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक, इन्स्टाग्रामव ट्विटरयेथे फॉलो करा.)
Title:बांगलादेश पोलिसांना दीपू चंद्र दासला जमावाच्या ताब्यात दिल्याचा दावा खोटा; असंबंधित व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


