
भारतीय डाक विभागाने टपाल पेट्या 1 सप्टेंबर 2025 पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, दावा भ्रामक असून भारतीय डाक विभागाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओ आणि फोटोमध्ये लाल टपाल दाखवले आहे.
युजर्स लाल टपालचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2025 पासून टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 1854 पासून सुरू झालेला प्रवास सप्टेंबर 2025 रोजी कायमस्वरुपी बंद करण्यात येत आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर भारतीय डाक विभागाने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आढळले.
तेलंगणा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल पी.व्ही.एस. रेड्डी यांनी ‘द हिंदू’ वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले की, “टपाल पेट्या बंद होणार नसून त्यांचे स्वरूप आणखी आधुनिक केले जाणार आहे. तसेच यापुढे या पत्रपेट्यांचे डिजिटल पद्धतीने निरीक्षण केले जाणार आहे.”
मूळ पोस्ट – द हिंदू
भारतीय टपाल खात्यानेदेखील व्हायरल दाव्याचे खंडन केलेले आहे.
लाल लेटरबॉक्सचे फोटो शेअर करत टपाल खात्याने ट्विट केले की, “मी अजूनही इथेच आहे आणि नेहमीच असेन! भारतीय पोस्ट काळानुसार विकसित होत आहे, परंतु काही गोष्टी नेहमीच तशाच राहतील. आमचे लाल लेटरबॉक्स येथेच राहतील.”
रजिस्टर्ड पोस्टचे विलीनीकरण
‘द इकोनॉमिक्स टाइम्स’ आणि ‘लोकमत’ने शेअर केलेल्या बातमीनुसार, “भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2025 पासून त्यांची रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय टपाल विभागाच्या आधुनिकीकरण योजनेचा एक भाग आहे. याचा उद्देश काम अधिक जलद चालवणे आहे. आता रजिस्टर्ड पोस्ट सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीन केले जाईल, ज्यामुळे ही 50 वर्षांहून अधिक जुनी सेवा इतिहास जमा होईल.”
मूळ पोस्ट – द इकोनॉमिक्स टाइम्स | लोकमत
रजिस्टर्ड पोस्ट सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीनीकरणा संदर्भात भारतीय डाक विभागाने 6 ऑगस्ट रोजी ट्विटरवर पोस्ट करून माहिती दिली. सोबतच यासंदर्भात दळणवळण मंत्रालयाद्वारे जारी केलेले पत्रही शेअर केलेले दिसते.
भारतीय डाक विभागाचे खंडण
रजिस्टर्ड पोस्ट सेवा असा दावा सोशल मीडियावर पसरल्यावर भारतीय डाक विभागाने 7 ऑगस्ट रोजी ट्विट करत स्पष्ट केले की, “रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद होणार नसून स्पीड पोस्टमध्ये विलीनीकरण करून सेवा अपग्रेड केली केली जाणार आहे.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल दावा भ्रामक असून भारतीय डाक विभागाने कायमस्वरूपी टपाल पेट्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. उलट भारतीय डाक विभागाने रजिस्टर्ड पोस्ट सेवा स्पीड पोस्टमध्ये विलीनीकरण करून सेवा अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:FACT-CHECK: 1 सप्टेंबरपासून टपाल पेट्या कायमस्वरूपी बंद होणार का? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Misleading
