
अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प भाषण देतानाची एक क्लिप व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, यावेळी ट्रम्प यांच्या समर्थकांनी “मोदी-मोदी” असा जयघोष केला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल क्लिपमध्ये लोक मोदी-मोदी नाही तर ‘बॉबी’ या नावाने नारे देत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल क्लिपमध्ये डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असताना लोकांचा नारा एकू येतो.
युजर्स ही क्लिप शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अमेरिकेची राष्ट्राध्यक्षाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प जिंकलेले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर व्हिक्टरी स्पीच चालू असताना मोदी-मोदी नावाचा गजर तुम्हाला ऐकू येईल.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर व्हायरल क्लिपमधील संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ आढळला.
पीबीएस न्यूजने 6 नोव्हेंबर रोजी युट्यूब चॅनलवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण केले होते.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, यात कुठेही पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.
व्हिडिओमध्ये ट्रम्प 7:52:14 मिनिटावर रॉबर्ट फ्रान्सिस केनेडी जूनियर यांचा उल्लेख करतात. त्यानंतर त्यांचे समर्थक ‘बॉबी’ असे नाव घेतात. रॉबर्ट केनडी यांना बॉबी या नावानेदेखील ओळखले जाते.
पुढे ट्रम्पदेखील रॉबर्ट केनेडी जूनियरचा उल्लेख ‘बॉबी’ या नावाने करत म्हणतात की, “बॉबी, आपल्याकडे सौदी अरेबिया, रशिया आणि जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त ‘लिक्विड गोल्ड’, तेल आणि वायू आहे. बॉबी, लिक्विड गोल्डपासून दूर राहा.”
रॉबर्ट फ्रान्सिस केनेडी जूनियर कोण आहेत ?
रॉबर्ट एफ. केनेडी अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडीचे पुतणे आहेत. यंदाच्या राष्ट्रपती निवडणुकीतही ते उमेदवार होते. परंतु, त्यांनी काही महिन्यांपूर्वी माघार घेतली. अधिक माहिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणादरम्यन लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी नाही तर रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर उर्फ ‘बॉबी’ यांच्या नावाचा नारा देत होता. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोदी-मोदी असे नारे लावले नाहीत; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
