जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हायरल व्हिडिओ नेपाळचा नाही; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर तेथील सरकार, कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर बनला आहे.  या पार्श्वभूमीवर जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, नागरिकांद्वारे पोलिसांवर हल्ला चढवण्याचा हा व्हिडिओ नेपाळचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ नेपाळचा नसून इंडोनेशियचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव लाठीकाठी व दगडफेक करत असून पोलिस सुरक्षाकवचा मागे लपून स्वतःचा बचाव करताना दिसतात. तसेच व्हिडिओमधील ग्राफिकमध्ये लिहिले होते की, नेपाळमध्ये पोलिसांना लपून बसावे लागले. 

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नेपाळ परिस्थिती भीषण झाली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना इंडोनेशियातील आहे.

कालेर बार्ता नामक न्यूज फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 3 सप्टेंबर रोजी शेअर केला होता. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “विद्यार्थ्यांनी हल्ला करायला सुरुवात केली तेव्हाही इंडोनेशियन पोलिसांनी त्यांना रोखले.”

पुढे एका युट्यूब चॅनलने 30 ऑगस्ट रोजी या व्हायरल क्लिपची मोठी आवृत्ती शेअर केलेली आढळली.

पुढे सर्चमध्ये ‘युडी एम मानार’ नामक युजरने 29 ऑगस्ट रोजी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर याच घटनेचे काही फोटो शेअर केले. 

लक्षात घेण्याची बाब म्हणजे या फोटोंसोबत कॅप्शनच्या हॅशटॅग्समध्ये इंडोनेशियातील शहर ‘मेदन’ आणि ‘उत्तर सुमात्रा प्रांतीय विधान परिषद’चा उल्लेख आढळतो.

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

हा धागा पकडून गुगल मॅपवर सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील जागा इंडोनेशियातील मेदन शहरामधील उत्तर सुमात्रा प्रांतीय विधान परिषदचा परिसर आहे. 

इंडोनेशियामधील हे काय प्रकरण ?

इंडोनेशियामध्ये 28 ऑगस्ट रोजी सुरक्षा अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या निदर्शनाला आवर घालण्याचा प्रयत्न करत असताना एका 21 वर्षीय मोटारसायकल टॅक्सी चालकाचा चिलखती पोलिसांच्या वाहनाने चिरडून मृत्यू झाला. अधिक महिती येथे, येथे येथे वाचू शकता. 

पोलिस गणवेशमधील फरक

खालील तुलनात्मक फोटोमध्ये आपण संरक्षक उपकरणे, हेलमेट व सुरक्षा कवचासह नेपाळ आणि इंडोनेशियान पोलिसांचे गणवेश पाहू शकता. 

नेपाळमधील परिस्थिती

नेपाळमध्ये सरकारचा भ्रष्टाचार, घराणेशाही आणि सोशल मीडियावर घातलेल्या बंदी विरोधात लोकांनी हिंसक आंदोलन केले. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्या घरावर आंदोलकांनी कब्जा करत पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. सध्या नेपाळच्या लष्कराने देशभारत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून हिंसाचार रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. अधिक महिती येथे, येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ नेपाळचा नसून इंडोनेशियाचा आहे. मुळात इंडोनेशियमध्ये सुरक्षादला कडून एका टॅक्सी चालकाचा चिरडून मृत्यू झाल्याने विद्यार्थांनी हिंसक निदर्शने करत पोलिसांवर हल्ला केला होती. दिशाभुल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याचा व्हायरल व्हिडिओ नेपाळचा नाही; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: Misleading