मुंबईमधील धारावीच्या राजीवनगर परिसरात काही दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादामध्ये मध्यस्ती करणाऱ्या अरविंद वैश्य नामक युवकाची पोलिसांसमोरच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याच पाश्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये व्यक्ती भर रस्त्यावर एका इसमाला धारधार शस्त्राने मारून तेथून निघून जात आहे.

दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ हिंदुत्ववादी कार्यकर्ता अरविंद वैश्य यांच्या हत्येचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, आंध्र प्रदेशमधील युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टीचे युवा नेते शेख रशीद यांच्या हत्येचा आहे. मारेकरी आणि मृत दोन्ही ही मुस्लिम होते.

काय आहे दावा ?

भररस्त्यावर निघृण हत्येचा व्हिडिओ शेअर करीत युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुंबई मधील धारावी क्षेत्रात हिंदु समाज हा अत्यंत संकटात आहे. कायद्याचे रक्षक म्हटले जाणाऱ्या पोलिसांसमोरच बजरंग दल कार्यकर्ता अरविंद वैश्य यांची जिहादी लांड्याने निर्घृणपणे हत्या केली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अरविंद वैश्य हत्याकांडशी संबंधित नाही. व्हिडिओतील घटना आंध्र पदेशमधील आहे.

इंडियन एक्सप्रेसने 19 जुलै रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार मृत व्यक्तीचे नाव शेख रशीद असून तो आंध्र प्रदेशमधील युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टीचे युवा नेता होता.

मूळ पोस्ट – इंडियन एक्सप्रेस | आर्काइव्ह

अधिक सर्च केल्यावर कळाले की, 18 जुलै रोजी आंध्र प्रदेशातील पालनाडू जिल्ह्यातील विनुकोंडा शहराचा मुख्य रस्तावर रात्री 8:30 च्या सुमारास ही घटना घडली होती. शेख रशीदवर अमानुषपणे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव शेख जिलानी आहे. जिलानीने रशीदच्या मानेवर प्राणघातक वार करण्यापूर्वी त्याचे दोन्ही हात तोडले होते.

माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलिस प्रमुख कांची श्रीनिवास राव यांनी सांगितले की, “ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असून त्यामागे कोणतेही राजकीय किंवा धार्मिक कारण नाही.”

तसेच विनुकोंडा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिअल इस्टेटच्या अयशस्वी व्यवहारावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. अधिक बातमी आपण येथे वाचू शकता.

https://youtu.be/S5hB2wV6D6c?si=FIBYYBal9ve46MPB

धारावीमधील अरविंद वैश्य हत्या प्रकरण

न्यूज18 मराठीच्या बातमीनुसार, धारावीच्या राजीव नगर भागात रविवारी रात्री अरविंद वैश्यची हत्या करण्यात आली. दोन गटांमध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या अरविंद वैश्य याची हत्या केली गेली.

अरविंद वैश्यचा भाऊ शैलेंद्र वैश्य याने केलेल्या तक्रारीनुसार अल्लू, आरिफ, शुभम आणि शेर अली यांचे सिद्धेशसोबत भांडण सुरू होते. हे भांडण सुरू असताना अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिद्धेश आणि त्याच्या वडिलांना मारायला सुरूवात केली. हे भांडण सोडवायला अरविंद तिकडे गेला, तेव्हा अल्लू आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अरविंदला मारहाण केली.

https://youtu.be/JBmbXSmFntw?si=sQFIvqlNPOjG2GK0

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अरविंद वैश्य याच्या हत्येचा नाही. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशमधील युवाजन श्रमिका रिथु काँग्रेस पार्टीचे युवा नेते शेख रशीद यांच्या हत्येचा आहे. मारेकरी आणि मृत दोन्ही ही मुस्लिम होते. तसेच पोलिसांनुसार या हत्येमागे जमीन व्यवहाराचे कारण होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आंधप्रदेशमधील असंबंधित व्हिडिओ धारावीतील अरविंद वैश्य यांच्या हत्येच्या नावाने व्हायरल

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading