सोशल मीडियावर एका ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करून दावा केला जात आहे की, अन्नामध्ये थुंकल्यावरच ते हलाल प्रमाणित होते असा युक्तिवाद तमिळनाडुतील न्यायालयाने मान्य केला.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रीनशॉटसोबत केलेला दावा खोटा आहे. तामिळनाडुतील न्यायालयाने अशा कोणत्याही युक्तीवादाला मान्यता दिलेली नाही.

काय आहे दावा ?

युजर्स हा स्क्रीनशॉट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “थुंकल्याशिवाय अन्न हलाल होत नाही. हा युक्तिवाद चेन्नई हायकोर्टात मान्य झाला.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम तर कुठल्याही दैनिकात अथवा वेबसाईटवर तमिळनाडुतील न्यायालयाने असा युक्तिवाद मान्य केल्याची बातमी आढळली नाही.

अधिक शोध घेतल्यावर कळाले की, सदरील व्हायरल दावा 2021 पासून सोशल मीडियावर केला जात आहे.

याप्रकरणाच्या मूळाशी गेल्यावर कळाले की, 2021 साली एस.जे.आर. कुमार यांनी केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘त्रावणकोर देवसोम बोर्डा’च्या विरोधात केरळ उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका होती.

कुमार केरळमधील सबरीमाला मंदिरातील प्रथा आणि परंपरांचे रक्षण करणारी संस्था ‘सबरीमाला कर्म समिती’चे महासंयोजक आहेत.

कुमार यांनी या याचिकेमध्ये सबरीमाला मंदिरातील प्रसादामध्ये हलाल-प्रमाणित गूळ वापरण्यावर आक्षेप घेतला होता.

खाली दिलेल्या याचिकेचा फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये केलेला दावा आणि कुमारने त्यांच्या याचिकेत केलेला आरोप हा एकच आहे.

मूळ पोस्ट – वर्डिक्टम | आर्काइव्ह

या ठिकाणी कुमारांनी केलेल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी कोणताही पुरावा देत नाही. ते म्हणतात की, "मुस्लिम समाजातील धार्मिक विद्वान सार्वजनिकरित्या घोषित करत आहेत की, अन्न सामग्री तयार करताना हलाल प्रमाणित करण्यासाठी लाळ आवश्यक घटक आहे. असे असतानादेखील सबरीमाला मंदिरात प्रसादमध्ये हलाल प्रमाणित गुळाचा वापर केला गेला. हे मंदिराच्या चालीरीती, धार्मिक विधी आणि भक्तांच्या धार्मिक अधिकारांचे उल्लंघन आहे.”

या पार्श्वभूमीवर केरळ खंडपिठाने या प्रकरणावर सविस्तर सुनावणी घेण्याची विनंती करत याचिकाकर्ते कुमार यांना हलालचा अर्थ माहित आहे का ? असा सवाल केला.

तत्पूर्वी, खंडपीठाने या प्रकरणात अॅडव्होकेट एन. रघुराज यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती. रघुराज यांनी कुमार यांच्या याचिकेचा विरोध केला. तसेच त्यांनी हलालची संकल्पना स्पष्ट करताना सांगितल की, “काही निश्चित गोष्टी प्रतिबंधीत केल्यास इतर सर्व गोष्टी हलाल आहेत. एखादे प्रतिबंधित साहित्य एखाद्या विशिष्ट उत्पादनामध्ये समाविष्ट केलेले नाही, एवढेच स्पष्ट करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र वापरले जाते.” संपूर्ण बातमी आपण येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल स्क्रीनशॉटसोबत केलेला दावा खोटा आहे. अन्न हलाल प्रमाणित करण्यासाठी थुंकणे आवश्यक असल्याचे तमिळनाडुतील न्यायालयाने मान्य केले नाही. चुकीच्या दाव्यासह स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:थुंकल्यावरच अन्न हलाल प्रमाणित होते असा युक्तीवाद न्यायालयाने मान्य केला नाही? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False