लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका चॅनलवरील कथित बातमीचा दाखला देत दावा केला जात आहे की, भाजपला हरविण्यासाठी मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या असे शरद पवारांनी आवाहन केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी बातमीचे स्क्रीनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोमधील विधान शरद पवार यांनी केले नव्हते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी हे वक्तव्य केले होते.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये ‘जय महाराष्ट्र’ चॅनलच्या बातमीचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या फोटोसोबत लिहिलेले आहे की, “पोटनिवडणुकीत मेलेल्यांचेही मतदान घडवा. संघाला हरवायला 100% मुसलमान मतदान करवा, मोदींना हरवायला प्रत्येक मुलमानाला मतदानाला आणा.”

कॅप्शनमध्ये युजर्स लिहितात की, "मेलेल्या मुस्लिमांचे ही मतदान घडवा" असे सांगणाऱ्या जिल्लेइलाहींचा पक्ष आज आचारसंहितेचे धडे देत आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक  | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ‘जय महाराष्ट्र’ चॅनेलवर बातमीचा शोध घेतल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेले विधान शरद पवारांनी केले नव्हते.

कसबा येथील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी 22 फेब्रुवारी 2023 रोजी अल्पसंख्यक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (विभाजन होण्यापूर्वीची) सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते.

खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मृत मुस्लिमांकडून मतदान करण्याचे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी केले होते.

https://youtu.be/wfMkdHa0mXs?si=FePJaISswSdJNTUl

आर्काइव्ह

टीव्ही-9 मराठीच्या बातमीनुसार, रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कसब्यामध्ये आयोजित अल्पसंख्याक मेळाव्यात हिरौली म्हणाले होते की, “मृत मुस्लिमांकडूनही मतदान करून घ्या. सौदी आणि दुबईला गेलेल्यांना बोलावून घ्या. त्यांना मतदान करायला सांगा. जोपर्यंत आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करणार नाही. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करू शकत नाही.”

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या फेसबुक पेजवर या मेळाव्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. शरद पवार त्यावेळेस मंचावर उपस्थित होते.

या विधानानंतर टीका होऊ लागल्यानंतर उस्मान हिरौली यांनी टीव्ही-9 मराठीशी बोलताना आपले म्हणणे स्पष्ट केले की, “कसबा मतदार संघातील जवळपास 1500 मुलं- मुली सौदी, दुबई, कुवेतमध्ये राहतात. 27 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांना मतदानासाठी बोलून घ्या अस मी म्हणालो होतो. या युवकांना मतदानासाठी प्रवृत्त करा असा संदेश मी दिला असून मतदानात वाढ व्हावी हाच माझा उद्देश आहे. तसेच ज्यांचे मन मेले आहे त्यांनीसुद्धा मतदान करावे असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.”

निवडणूक आयोगच्या मार्गदर्शक सूचना

भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान सात टप्प्यांत मतदान होईल आणि निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाईल.

तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या निवडणुकीत प्रचार करताना धर्म, जात, भाषेच्या आधारावर मतं मागू नयेत, प्रार्थनास्थळांचा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपयोग करू नये, देव आणि भक्त यांच्यातील नात्याचा अवमान होईल अशी विधाने करू नयेत, विभाजनवादी प्रचार करू नये. तसेच मतदारांची दिशाभूल करणारे विधान करू नये. असे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सांगितले आहे. संपूर्ण बातमी आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील विधान शरद पवार यांनी केले नव्हते. ते वादग्रस्त विधान काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी केले होते. चुकीच्या माहितीसह जुन्या बातमीचे स्क्रीनशॉट योग्य संदर्भाशिवाय शेअर केले जात आहेत.

Avatar

Title:“मोदींना हरवण्यासाठी मृत मुस्लिमांचे मतदान करून घ्या” असे शरद पवारांनी म्हटले का? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: False