यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा त्यांच्या ’15 सेकंदा’च्या विधानामुळे चर्चेत होत्या. काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून राणा यांचा सुमारे वीस हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर सोशल मीडियावर नवनीत राणा यांचा धायमोकलून रडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, पराभव सहन न झाल्यामुळे राणा यांना असे रडू कोसळले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून त्याचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीशी काही संबंध नाही.

काय आहे दावा?

व्हायरल व्हिडिओमध्ये नवनीत राणा रडत असून त्यांचे पती आमदार रवी राणा त्यांचे सांत्वन करताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करून राणा यांची खिल्ली उडविली जात आहे की, पराभवाने त्या कोलमडून पडल्या.

मूळ व्हिडिओ – फेसबुक

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये न्यूज-18 वाहिनीचा लोगो आहे. त्यानुसार सर्च केल्यावर सीएनएन-न्यूज18 वाहिनीच्या युट्यूब चॅनेलवर मूळ व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ 5 मे 2022 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. याचाच अर्थ की, हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, हा व्हिडिओ मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधील आहे. त्यांना भेटायला पती रवि राणा आले असता त्यांना पाहताच नवनीत राणा यांना रडू कोसळले होते.

https://www.youtube.com/watch?v=3zfLs58u-34

नवनीत राणा का रडल्या होत्या?

2022 साली तत्कालिन अपक्ष खासदार नवनीत राणा यांना त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केले होते. त्यांनी ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठन करण्याचा निर्धार जाहीर केला होता. यावरून मोठा झाला होता आणि नवनीत राणा यांना अटक करण्यात आली होती.

13 दिवसांच्या कोठडीनंतर नवनीत राणा यांना लीलावती दवाखान्यात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले होते. तेथे त्यांना भेटायला पती रवी राणा आले असता त्यांना पाहताच नवनीत राणा रडल्या होत्या.

https://www.youtube.com/watch?v=93sffYAC3QY

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, नवनीत राणा यांचा रडतानाचा व्हायरल व्हिडिओ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरचा नाही. जुना व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नवनीत राणा यांचा रडतानाचा हा व्हिडिओ जुना; लोकसभा निवडणूक परावभवाशी त्याचा संबंध नाही

Fact Check By: Agastya Deokar

Result: Missing Context