जीपवर रक्तबंबाळ गायीच्या मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, केरळच्या वायनाडमध्ये राहुल गांधींनी काढलेल्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी तेथील मुस्लिमांनी गाय कापली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये चार चाकी वाहनावर ठेवलेल्या गायीचे शव दाखवले आणि सोबत एक व्यक्ती दावा करत आहे की, राहुल गांधींनी केरळच्या वायनाडमध्ये काढलेल्या रॅलीचे स्वागत करण्यासाठी तेथील मुस्लिमांनी ही गाय कापली होती.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “काँग्रेसला मत देणारे हिंदू हे बघा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्व प्रथम राहुल गांधींनी केरळमधील वायनाड जिल्ह्यात काढलेल्या रॅलीमध्ये त्यांचे स्वागत करण्यासाठी मुस्लिमांनी गाय कापली, अशी कोणतीही बातमी माध्यमांमध्ये आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर @wayanadview नावाच्या इन्स्टाग्राम युजर्सने हाच व्हिडिओ 17 फेब्रुवारी रोजी शेअर केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “जेव्हा पुलपल्लीत लोकांनी कायदा हातात घेतला.”

https://www.instagram.com/reel/C3cfxcMyFrP/?utm_source=ig_web_copy_link

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, एशियानेटच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर 17 फेब्रुवारी रोजी एका लाईव्ह व्हिडिओ अपलोड केला होता. ज्यामध्ये संतप्त लोकांनी मृत गाय वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या जीपवर बांधली. सोबत दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका निदर्शनाचे आहेत.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याने गाईचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने त्यांच गाईचे शव वन विभागाच्या जीपला बांधले होते.

आर्काइव्ह

फ्री प्रेस जर्नल आणि द हिंदूस्तान टाईम्सच्या बातमीनुसार जंगलात झालेल्या हल्ल्यात वनविभागाचे पर्यवेक्षक व्ही.पी.पॉल यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या निषेधार्थ शेकडो लोक पुलापल्ली शहरातील रस्त्यावर उतरले होते.

जिल्ह्य़ात सुरू असलेल्या मानव - वन्यजीवामधील संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत होते. यादरम्यान संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. मात्र जमावाने वनविभागाची जीप अडवून तिचे नुकसान केले आणि वाघाने मारलेल्या गायीचा मृतदेह आणून जीपवर बांधल्याने तणाव आणखी वाढला होता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ राहुल गांधीशी संबंधित नाही. केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याने गाईचा मृत्यू झाल्याने संतप्त जमावाने वनविभागाच्या जीपवर गायीचा मृतदेह बांधला होता. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राहुल गांधीच्या रॅलीचे स्वागतासाठी केरळमध्ये गाय कापण्यात आली नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading