महाविकास आघाडीच्या सरकारला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झाली. तसेच, नारायण राणे यांनी मविआ सरकार पडणार असून मार्च महिन्यामध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे विधान केले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात भाजपचे महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत होते.

या पार्श्वभूमीवर एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा एकत्र बसलेले दिसत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येत असल्याच्या वावड्या उठल्या.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो बनावट आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या फोटोत शरद पवारांचा फोटो मॉर्फ करण्यात आला आहे.

काय आहे दावा?

पोस्टमध्ये म्हटले की, ताई म्हणतात की, “भाजपला जोरदार विरोध करा. आणि पप्पा चुपचाप जाऊन भाजपसोबत हातमिळवणी करतात. ताई, किती दिशाभूल करता जनतेची!”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची खरंच बैठक झाली असती तर नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, तशी कोणतीही बातमी आढळून येत नाही. तसेच या तिघांचा एकत्र बसलेला अधिकृत फोटोसुद्धा सापडला नाही. त्यामुळे याच्या सत्यतेविषयी शंका येते.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असेला फोटो बनावट आहे.

फोटो क्र. 1

देवेंद्र फडणवीस यांनी 26 नोव्हेंबर 2021 रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली होती. त्यांनी स्वतः ट्विट करून या बैठकीचा फोटो शेअर केला होता. या फोटोत शरद पवार नाहीत.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1464154695484600323

फोटो क्र. 2

शरद पवारांनी 12 नोव्हेंबर 2021 रोजी इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी यांची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवर अपलोड केला होता.

https://twitter.com/pawarspeaks/status/1459082601654751234

वरील दोन्ही फोटो एकत्र मॉर्फ करून व्हायरल फोटो तयार करण्यात आला आहे. फडणवीस आणि शहांच्या बैठकीच्या फोटोत शरद पवारांचा फोटो नंतर टाकण्यात आले आला आहे. नवाब मलिक यांनीसुद्धा बनावट फोटो मॉर्फ असल्याचे ट्विट केले होते.


शरद पवारांनी झोपडीत जेवण करताना बियर घेतली का? वाचा त्या फोटोमागचे सत्य काय आहे


सदरील फोटो बनावट फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सायबर पोलिसांकडे याविषयी तक्रार केली होती. असे फोटोशॉप केलेले फसवे फोटो कोण पसरवतेय याचा शोध घेण्याची त्यांनी विनंती केली होती.

मूळ ट्विट - ट्विटर

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचा तो फोटो बनावट आहे. दोन वेगवेगळे फोटो मॉर्फ करून तो तयार करण्यात आला आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा एकत्र? काय आहे या फोटोचे सत्य?

Fact Check By: Agastya Deokar

Result: Altered