सध्या महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य शासन विभागाने सध्या महाराष्ट्रात जीव घेणे थंडीचे आगमन झाले असून नागरिकांनी घरा बाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा दिला आहे, असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेला मेसेज महाराष्ट्र आरोग्य शासन विभागाने जारी केला नाही. चुकीच्या दाव्यासह हा मेसेज व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल मेसेजमध्ये लिहिले आहे की, “सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे. रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे. याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. अचानक बी.पी.कमी होणे, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज, रक्तवाहिन्या गोठणे, हार्टअटॅक, मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ शकते. रात्री घराबाहेर पडू नये. सुती उबदार कपडे घालावे, पाणी भरपूर प्यावे, हातमोजे, पायमोजे, स्वेटर, कानटोपी, रग यांचा वापर करावा. सतर्क रहा, सावधान रहा, जनहितार्थ जारी!! महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग.”

मूळ पोस्ट – फेसबुक

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने असा कोणता मेसेज जारी केला असता तर ही एक मोठी बातमी ठरली असती. परंतु, माध्यामांमध्ये अशी कोणती ही बातमी आढळली नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा मेसेज गेले अनेक वर्षी पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक

पुढे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने छत्रपती संभाजीनगरचे आरोग्य उपसंचालक डॉ. भूषणकुमार रामटेके यांच्याशी संपर्क साधला. व्हायरल मेसेजचे खंडण करत त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाकडून असा कोणताही आदेश आम्हाला मिळाला नाही. व्हायरल मेसेज फेक असून नागरिकांनी चिंता करण्याचे किंवा भिती बाळगायचे कारण नाही.”

खरंच थंडीमुळे हार्ट अटॅक येतो का ?

हा सवाल फॅक्ट क्रेसेंडोने छत्रपती संभाजीनगरच्या घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीच वातावरण जरी असले तरी मानव शरीरात हा बदल सहन करण्याची क्षमता असते. व्हायरल मेसेजच्या पार्श्वभूमीवर अचानक थंडी वाढल्यामुळे आपल्या हार्ट अटॅक, शरीर लुळे पडणे, पक्षाघात, ब्रेनहॅमरेज, रक्तवाहिन्या गोठणे किंवा मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे, असा कोणतेही धोका निर्माण होत नाही. परंतु, या थंडीच्या काळात वयोवृद्ध किंवा सायनस सारख्या आजार असलेल्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच अशा थंडीच्या वातावरणात गरम कपडे घालणे आणि कोमट पाणी पिणे आवश्यक आहे.”

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल मेसेज महाराष्ट्र आरोग्य शासन विभागाने जारी केला नव्हता. गेले अनेक वर्षांपासून हा मेसेज सोशल मीडियावर चुकीच्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:महाराष्ट्रात थंडीमुळे हार्ट अटॅक होण्याची शक्यता; असा फेक मेसेज आरोग्य शासन विभागाच्या नावाने व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False