एका टीव्ही पत्रकाराने नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओद्वारे दावा केला की, फोनमध्ये *#21# हा क्रमांक डायल केल्यावर आपला फोन हॅक झाला की नाही याची माहिती कळते.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक जणांनी फोनच्या सुरक्षततेबाबत चिंता व्यक्ती केली. फोन हॅक झाला की नाही हे जाणून घेण्याचा सोपा उपाय म्हणून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून त्याच्या सत्यतेबाबत विचारणा केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओमध्ये केला जाणारा दावा खोटा आणि भ्रामक आहे. फोनमध्ये *#21# हा क्रमांक डायल केल्यावर फोन हॅक झाला की नाही हे कळत नाही.

काय आहे दावा?

टीव्ही-9 भारतवर्ष वाहिनीचे पत्रकार राहुल सिन्हा यांनी 17 डिसेंबर रोजी सदरील व्हिडिओ ट्विट केला. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी एक क्रमांक मी सांगतो जो डायल केल्यावर कळेल की, तुमचा फोन हॅक झाला की नाही? जर फोन हॅक असेल तर आणखी एक क्रमांक सांगतो जो तुमची हॅकरच्या तावडीतून सुटका करेल.”

व्हिडिओमध्ये सिन्हा त्यांच्या फोनवर *#21# क्रमांक डायल करतात. मग स्क्रीनवर एक मेसेज येतो. सिन्हा सांगतात की, या मेसेजमध्ये जर सगळे पर्याय ‘'disabled’ दाखवत असेल तर फोन सुरक्षित समजावा. आणि जर ते 'enabled’ असेल तर फोन हॅक झाला म्हणून समजा.

पुढे ते यावरचा उपायदेखील सांगतात. ते म्हणतात की, “हॅकिंगच्या सेटिंग्समधून बाहेर पडण्यासाठी ##002# क्रमांक डायल करावा.”

https://twitter.com/RahulSinhaTV/status/1736239006185365956

मूळ व्हिडिओ – ट्विटर

तथ्य पडताळणी

इंटरनेटवर सर्च केल्यावर कळाले की, *#21# हा क्रमांक कॉल फॉरवर्डिंग सेटिंग सुरू आहे की बंद याची माहिती तपासण्यासाठी असतो. हा क्रमांक हॅकिंग किंवा फोन टॅपिंगबद्दल काहीही माहिती देत नाही.

गॅजेट मेट्स वेबसाईटनुसार, *#21# हा Unstructured Supplementary Service Data (USSD) कोड आहे. हा कोड डायल केल्यावर आपल्या फोनवर कॉल फॉरवर्डिंगची सेवा सुरू आहे की नाही आणि असेल तर तो कोणत्या क्रमांकाला फॉरवर्ड केला जातोय याची माहिती मिळते.

गुगल (अँड्रॉईड) आणि अॅपल (आयफोन) कंपन्यांमधील तज्ज्ञांनी *#21# क्रमांकाविषयचीच्या अफवांचे खंडन केलेले हे. त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की, *#21# हा कोड केवळ कॉल फॉरवर्डिंग स्टेट्ससाठी आहे. त्याचा फोनच्या सुरक्षेशी काही संबंध नाही.

आपल्या फोनमध्ये असे अनेक USSD कोड असतात. उदाहरणार्थ, बीएसएनलचे ग्राहक बॅलन्स तपासण्यासाठी *123# हा कोड वापरू शकतात. तसेच आपल्या फोनचा IMEI क्रमांक जाणून घेण्यासाठी *#06# हा कोड आहे.

##002# कोड काय करतो?

फोनमधील कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्यासाठी ##002# या कोडच्या वापर करतात. हा कोड डायल केल्यावर फोनमध्ये जर कॉल फॉरवर्ड सुरू असेल तर ती सेवा बंद होते. समजा आपल्याला येणारे कॉल आपण दुसऱ्या एखाद्या क्रमांकावर फॉरवर्ड केलेले असतील तर ##002# कोड ते फॉरवर्ड थांबवितो. हा कोड हॅकिंगपासून सुरक्षित राहण्याचा नाही.

कॉल फॉरवर्डिंग कशी सुरू करावी?

कॉल फॉरवर्ड करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे फोनच्या सेटिंगमध्ये जाणून ते ऑप्शन आपण सुरू किंवा बंद करू शकतो. त्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स आहेत.

Settings > Call > Advance settings > Call forwarding.

दुसरा पर्याय म्हणजे USSD कोडच्या वापर करूनही ही सेवा सुरू केली जाऊ शकते. कंपन्यांनुसार हा कोड बदलू शकतो.

दूरसंचार कंपनीकॉल फॉरवर्डिंगचा प्रकारUSSD कोड
JioForward all calls*401*<10 अंकी फोन क्रमांक>
BSNLForward all calls**21**<10 अंकी फोन क्रमांक >#
AirtelForward all calls**21* <10 अंकी फोन क्रमांक >#
VIForward if not reachable **62*<10 अंकी फोन क्रमांक >#

कॉल फॉरवर्ड बंद करण्यासाठी ##002 हा कोड डायल करू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, *#21# हा क्रमांक डायल करून फोन हॅक झाला की नाही याबद्दल कोणतीही माहिती मिळत नाहीत. तो केवळ कॉल फॉरवर्ड सेवेची माहिती देतो. त्यामुळे व्हायरल दावा खोटा आणि भ्रामक आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:*#21# क्रमांक डायल केल्यावर फोन हॅक झाला की नाही हे कळते का? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar

Result: False