कोल्हापुरमध्ये मुस्लिमांकडून किडनीबाधक गोळ्या असणारे मासे विकले जात नाहीत; व्हायरल दावा खोटा

Update: 2024-10-05 13:30 GMT

सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, कोल्हापुरमध्ये मुस्लिम विक्रेते माशांच्या पोटात किडनी खराब करणाऱ्या गोळ्या टाकून विकत असताना पोलिसांनी पकडले. सोबत पोलिसद्वारे माशांची तपासणी करतानाचा व्हिडिओ शेअर होत आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कोल्हापुरचा नसून केरळचा आहे. तसेच तेथेसुद्धा माशाच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या टाकण्यात आल्या नव्हत्या.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये ब्रेव्ह इंडियाचा लोगो दिसतो. तसेच व्हिडिओमध्ये दोन पोलिस व एक सरकारी अधिकारी मासे तपासताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी गावामध्ये मुसलमानाने प्रत्येक माशाच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या ठेवल्या.”

Full View

मूळ पोस्टफेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी गावाचा नाही. 

ब्रेव्ह इंडियाच्या युट्यूब चॅनलवर हाच व्हिडिओ 25 जुलै रोजी अपलोड केलेला आढळला.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “कोचीमधील विविध बाजारपेठांमधून पोलिसांनी अळीग्रस्त मासे जप्त केले.”

ब्रेव्ह इंडियाने हाच व्हिडिओ त्यांच्या फेसबुक आणि इंस्टग्राम पेजवर शेअर केला आहे.

Full View

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार कोची महामंडळाच्या आरोग्य शाखेने जुलै महिण्यात नियमित तपासणी करून पल्लुरुथी येथे सुमारे 200 किलो शिळे मासे जप्त करून नष्ट केले.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना कोची महामंडळाचे आरोग्य निरीक्षक सुधीश कुमार सांगतात की, "पल्लुरुथी येथे विक्रेते शिळे मासे लोकांना कमी किमतीत विकत आहेत, असे आम्हाला आढळले. विक्रेत्यांनी फ्रीजरमध्ये जास्त काळ मासे ठेवल्यामुळे त्यांच्यापासून दुर्गंध येत आहेत. ते मासे मानवी अरोग्यासाठी योग्य नाही."

पुढे फॅक्ट क्रेसेंडोने पल्लुरुथी सर्कलचे आरोग्य निरीक्षक आर.एस.मधू यांच्याशी संपर्क साधल्यवर त्यांनी सांगितले की, "आम्ही पल्लुरुथी भागात दूषित आणि खराब झालेले मासे आणि मांस यांची विक्री रोखण्यासाठी वेळोवेळी तपासणी करतो. जेव्हा आम्ही थोपपुमपाडी आणि पल्लुरुथी भागातील माशांच्या दुकानांचे असेच सर्वेक्षण केले. तेव्हा आम्हाला अस्वच्छ पद्धतीने विकले जाणारे 650 किलो कुजलेले मासे आढळले. ते मासे जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली."

किडनीबाधक गोळ्यांच्या दाव्याचे खंडन करताना त्यांनी सांगितले की, "व्हायरल दावा खोटा आहे. आमच्या सर्वेक्षणात माशांमध्ये किडनीबाधक गोळ्या टाकून विक्री होत असल्याचे कुठेही आढळले नाही."

तसेच पल्लुरुथी पोलिस स्टेशनशी संपर्क साधल्यावर वरिष्ठ कॉन्स्टेबल अरुण यांनी सांगितले की, "या चाचणीत फक्त खराब झालेले मासे (जंत असलेले) जप्त करण्यात आले होते. माशांमध्ये किडनीवर परिणाम करणाऱ्या गोळ्या टाकून त्या विकल्या जात असल्याची कोणतीही घटना किंवा तक्रार अद्याप समोर आलेली नाही."

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, कोल्हापुरमध्ये मुस्लिम विक्रेत्यांकडून माशांच्या पोटात किडनीबाधक गोळ्या टाकून विक्री केली जात असल्याचा दावा खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ केरळचा असून तेथिल पोलिसांनी शिळे मासे जप्त केले होते. त्या ठिकाणी मुस्लिम विक्रेत्यांकडून किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या टाकलेले मासे विकले जात नव्हते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim :  कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी गावामधील माशाच्या पोटात किडन्या खराब करणाऱ्या गोळ्या ठेवलेल्या पोलिसांनी जप्त केल्या.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  FALSE
Tags:    

Similar News