इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू खरंच जीव वाचवण्यासाठी धावत आहे का ? वाचा सत्य

Update: 2024-10-03 08:11 GMT

इस्रायलने लेबनॉनमधील हेजबोला या संघटनेच्या मुख्यालयावर केलेल्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ला केला. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू पळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, इराणने हल्ला केला तेव्हा नेतन्याहू जीव वाचवण्यासाठी बंकरकडे धावतानाचा हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे. जेव्हा नेतन्याहू संसदेमध्ये वेळेवर पोहचण्यासाठी धावपळ करत होते.

काय आहे दावा ?

बारा सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती इमारतीमध्ये धावताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जीव वाचवण्यासाठी धावत आहेत. किती दिवस ते बंकरमध्ये लपून बसतील.”

मूळ पोस्ट – फेसुबक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे.

बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हाच व्हिडिओ 14 डिसेंबर 2021 रोजी शेअर केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "तुमच्यासाठी धावण्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. हा व्हिडिओ नेसेटमध्ये पोहचण्याच्या अर्ध्या तासापूर्वी घेतला होता."

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, बेंजामिन नेतन्याहू 2021 मध्ये विरोधी पक्षाचे प्रमुख असताना इस्रायली विधानमंडळाची मध्यवर्ती संस्था नेसेट प्लेनममधील मतदानासाठी वेळेवर पोहोचण्यासाठी त्यांच्या कार्यालयातून धावले होते.

मूळ पोस्ट – आयएनएन न्यूज | आर्काइव्ह

नेसेट प्लेनम काय आहे ?

नेसेट ही सर्व कायदे पास करणारी, राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान निवडणारी आणि मंत्रिमंडळाला मान्यता देणारी इस्रायलची एकसदनीय विधानसभा आहे.

तसेच नेसेट प्लेनम ही नेसेटची सर्वोच्च अधिकृत संस्था आहे. नेसेटचे ठराव प्लेनममध्ये मतदानाद्वारे स्वीकारले जातात. अधिक माहिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा आहे. 2021 मध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू इस्रायलची संसद नेसेटमध्ये वेळेवर पोहचण्यासाठी धावपळ करत होते. इराणने हल्ला केला तेव्हा नेतन्याहू बंकरकडे धावतानाचा हा व्हिडिओ नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

 

Claim :  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू जीव वाचवण्यासाठी धावत आहेत.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  MISSING CONTEXT
Tags:    

Similar News