पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण 'आरक्षण विरोधी' असल्याचे म्हटले नाही; अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Update: 2024-09-23 06:29 GMT

विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यावर काहि ठिकाणी विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये ते म्हणतात की, “मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवडत नाही, विशेषतः नोकरीमधील आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणार्‍या या गोष्टींच्या मी विरोधात आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मी आरक्षण विरोधी आहे,’ असे म्हटले नाही. ते पंडित जवाहरलाल नेहरुंच्या पत्राबाबत बोलत होते.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ते आरक्षण विरोधी असल्याचे बोलतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “राहुल गांधीच्या नावाने कोकलणाऱ्यां लोकांना, अंधभक्तांना मोदी साहेबांचं अरक्षणा बद्दल च मत दाखवा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर कळते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत आहेत.

कीवर्ड सर्च केल्यावर कळाले की, 7 फेब्रुवारी 2024 रोजी नरेंद्र मोदींनी राज्यसभेत आरक्षणाचा मुद्दा मांडला होता.

या भाषणाचे थेट प्रक्षेपण संसद टीव्हीने अधिकृत युट्यूब चॅनल वरून केले होते.

Full View

काँग्रेस अध्यक्ष मलिक अर्जुन खरगे यांनी भाजपवर निशाना साधत प३ केला होता की, सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले तरीदेखील भाजप सरकार अद्याप महिला आरक्षण का लागू करत नाही?

या प्रश्नाचे उत्तर देताना नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की, “ज्या काँग्रेसने कधीही ओबीसींना पूर्ण आरक्षण दिले नाही, ज्या काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्नसाठी पात्र मानले नाही, सर्वसामान्य वर्गातील गरिबांना कधीही आरक्षण दिले नाही, फक्त आपल्या कुटुंबालाच भारतरत्न देत राहिले. ते आता आम्हाला सामाजिक न्यायाचे धडे देत आहेत.”

पुढे आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी ते सांगतात की, “जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मी त्याचे भाषांतर वाचत आहे – मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवडत नाही, विशेषतः नोकरीमधील आरक्षण. अकार्यक्षमतेला चालना देणार्‍या या गोष्टींच्या मी विरोधात आहे. म्हणूनच मी म्हणतो की, काँग्रेस पूर्वीपासूनच आरक्षणाच्या विरोधात आहे. सरकारने त्यावेळी भरती केली असती आणि वेळोवेळी नोकऱ्या दिल्या असत्या तर आज ते इथे असते.”

म्हणजे नरेंद्र मोदी जवाहरलाल नेहरुंच्या वक्तव्याबाबत बोलत होते.

सरदरील वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.

खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट क्लिप पसरविली जात आहे.

Full View

नेहरूंच्या पत्राचा संदर्भ काय होता ?

कायदेतज्ज्ञ माधव खोसला यांनी संपादित केलेल्या नेहरूंच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांच्या संकलनानुसार 27 जून 1961 च्या पत्रात, तत्कालिन पंतप्रधान 'विशिष्ट जातीला दिल्या जाणाऱ्या आरक्षणाच्या आणि विशेष सवलतींच्या जुन्या सवयीतून बाहेर पडण्याविषयी बोलले.'

त्या पत्रात ते म्हणाले होते की, “मदत जातीवर नव्हे तर आर्थिक विचारांवर दिली जावी. हे खरे आहे की, आम्ही अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना मदत करण्याबाबत काही नियमांशी बांधील आहोत, ते मदतीस पात्रही आहेत; परंतु तरीही मला कोणत्याही प्रकारचे आरक्षण आवडत नाही. विशेषतः नोकरीतील. मी अकार्यक्षमतेच्या विरोधात आहे. माझा देश प्रत्येक गोष्टीत प्रथम श्रेणीचा देश असावा, अशी माझी इच्छा आहे.” संपूर्ण पत्र आपण येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये परंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आपण आरक्षणा विरोधी’ असल्याचे म्हणत नाही. ते तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या पत्रतील काही ओळी वाचत होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Claim :  राहुल गांधीच्या नावाने कोकलणाऱ्यां लोकांना, अंधभक्तांना मोदी साहेबांचं अरक्षणा बद्दल च मत दाखवा.
Claimed By :  Social Media User
Fact Check :  ALTERED
Tags:    

Similar News