माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, अब्दुल कलामांनी भारतातील मदरशांना दहशतवाद शिकवणारे केंद्र म्हणत त्यांच्यावर बंदी घालण्याचे विधान केले होते.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे कात्रण आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्ट खोटी आहे अब्दुल कलाम यांनी कधीही मदरशांवर बंदी घालण्याचे वक्तव्य केले नव्हते. त्यांचे नावे बनावट विधना पसरविले जाते.

काय आहे दावा ?

व्हायरल पोस्टमध्ये ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या फोटोसह लिहिले आहे की, “मुस्लिमांना जन्माने दहशतवादी नसतात. त्यांना मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, ज्यानुसार ते हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, ज्यू आणि गैर-मुस्लिमांना मारण्यास सांगितले जाते. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतामध्ये चालणाऱ्या हजारो मदरशांवर बंदी घालणे महत्वाचे आहे.” (भाषांतर)

युजर्स ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “डॉ,ए,पी,जे अब्दुल कलाम यांनी आधीच सांगून ठेवले होते. हिंदूंनो सावध रहा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी खरंच असे विधान केले असते तर ही एक मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर अशी माहिती मिळत नाही.

अब्दुल कलाम दहशतवादाविषयी काय म्हणाले होते याचा शोध घेतल्यावर त्यांनी वेळोवेळी केलेल्या विधानांमध्ये कुठेही मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली नसल्याचे आढळले नाही.

मुंबई पोलिसांनी 2010 साली आयोजित केलेल्या 'फाईट अगेस्ट टेररिझम' कार्यक्रमात अब्दुल कलाम म्हणाले होते की, दहशतवादाला आळा घालण्यासाठी अशा गुन्हेगारांना योग्य वेळेत शिक्षा होईल असे कठोर कायदे करावेत.

दहशतवादाविरोधात लढण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीबरोबरच नागरिकांनसुद्धा या लढाईत सामील करून घेण्याचे त्यांनी आवाहन केले होते. त्याबरोबरच सुरक्षयंत्रणांना आधुनिक हत्यारे उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली होती.

मूळ पोस्ट – हिंदुस्तान टाईम्स

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने 2013 साली आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना अब्दुल कलाम यांनी दहशतवादाविरोधात सकारात्म उपाययोजना आखण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते.

"दहशतावादासारख्या अनिष्ट प्रवृत्तीला हरविण्यासाठी सकारात्म प्रतियोजना उभी केली पाहिजे. वाईट कामाला रोखण्यासाठी चांगल्या लोकांना एकत्र येणे गरजेचे आहे," असे कलाम म्हणाले होते.

मूळ पोस्ट – बिझनेस स्टँडर्ड

अब्दुल कलाम यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी आणि सल्लागार सृजन पाल सिंग यांच्या मते, "डॉ कलाम यांचे स्वप्न राष्ट्राला दहशतवादमुक्त करण्याचे होते."

मूळ पोस्ट – दैनिक ट्रिब्यून

फॅक्ट क्रेसेंडोने डॉ. अब्दुल कलाम यांचे नातू शेख सलीम यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन करत सांगितले की, " व्हायरल कात्रण खोटे असून अब्दुल कलामांनी कधीही कोणत्याही धर्मावर अशा प्रकारची टिप्पणी केली नाही."

मग मदरशांवर बंदी घालण्याची मागणी कोणी केली होती?

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

रिझवी यांनी म्हटले होते की, “इसिससारखी दहशतवादी संघटना भारतातील मुस्लिमबहुल भागात प्रभाव टाकण्यासाठी मदरशांचा वापर करीत आहे. हे रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी मदरशांवर बंदी घालावी.”

मूळ पोस्ट – हिंदुस्तान टाईम्स

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल पोस्ट खोटी आहे. अब्दुल कलाम यांनी कधीही दहशतवाद रोखण्यासाठी मदरशांवर बंदी घालण्यास सांगितले नव्हते. खोट्या दाव्यासह पोस्ट व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अब्दुल कलामांनी दहशतवाद रोखण्यासाठी मदरशांवर बंदी घातलण्यास सांगितले नव्हते; खोटे विधान व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False