वडिलांविषयी गाणं गाणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, हा एका शहीद लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे. वडिलांनी देशासाठी प्राण दिल्यानंतर हा मुलगा सध्या सैनिक शाळेत शिकत असल्याचेही सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओ भारतातील नसून पाकिस्तानचा आहे. हा मुलगा तेथील बालकलाकार आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा ‘बाबा मेरे प्यारे बाबा’ गाण गाताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लहितात की, “तो लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे ज्याच्या वडिलांचा अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्याच्या आईचा धक्का बसून मृत्यू झाला. तो बोर्डिंग आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, हा व्हिडिओ नऊ वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

सिब्तेन टीव्हीने 19 डिसेंबर 2015 रोजी आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओच्या कॅप्शननुसार, या मुलाचे नाव गुलाम मुर्तझा आहे.

पाकिस्तानच्या पेशावर शहरातील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित संगीत कार्यक्रमात या मुलाने हे गीत गायले होते.

https://youtu.be/1nWmuyA3Kuk?si=EdAcySDAaozPN4w2

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, गुलाम मुर्तझाच्या वडिलांचे नाव नदीम अब्बास असून ते एक संगीतकार आहेत.

या पूर्वीदेखील या व्हिडिओसोबत चुकीचा दावा व्हायरल झाला होता. त्यानंतर नदीम अब्बास यांनी 13 डिसेंबर 2019 आपल्या युट्यूब चॅनलवर या दाव्याचे खंडन केले होते.

खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये 4:35 मिनिटापासून नदीम अब्बास सांगतात की, "गुलाम-ए-मुर्तझा हा कोणत्याही शहिद लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा नाही. तो माझा मुलगा आहे. मी आणि माझे कुटुंब सुखरूप आहे."

https://youtu.be/X9e8jRjwMTA?si=_wmM5XxIP-ARK6qI&t=275

खालील फोटोमध्ये आपण व्हायरल व युट्यूब व्हिडिओमधील मुलगा गुलाम ए मुर्तझा, वडिल नदीम अब्बास आणि अजोबा शेहजाद अख्तर शेजादा पाहू शकतात.

आर्मी पब्लिक स्कूल हल्ला

पाकिस्तानमध्ये 16 डिसेंबर 2014 रोजी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित सहा दहशतवाद्यांनी पेशावरच्या वायव्य शहरातील आर्मी पब्लिक स्कूलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 132 मुलांसह 147 जणांचा मृत्यू झाला होता. अधिक महिती येथे वाचू शकतात.

या हल्ल्यातील मृतांच्या स्मरणार्थ गुलाम मुर्तझाने हे गाणे गायले होते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमध्ये गाणं गाणाऱ्या मुलाचे वडिल शहिद लष्करी अधिकार नसून पाकिस्तानी संगितकार नदीम अब्बास आहेत. हा व्हिडिओ गेले 9 वर्षांपासून भ्रामक दाव्यासह शेअर केला जात आहे.

Avatar

Title:‘बाबा मेरे, प्यारे बाबा’ गाणं गाणाऱ्या मुलाचे वडील शहिद लष्करी अधिकारी नाहीत; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False