सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही पांढऱ्या रंगाचे बॉक्स दाखवले आहेत. दावा केला जात की, “व्हिडिओमध्ये दाखवलेल्या बॉक्समध्ये कुत्र्याचे मांस असून अब्दुल रझाक नामक व्यक्ती हे मांस संपूर्ण बंगळुरू शहरात हॉटेलांमध्ये पाठवणार होती.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले मांस कुत्र्याचे नसून मेंढीचे आहे.

काय आहे दावा ?

या एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये काही पांढऱ्या रंगाचे बॉक्स दाखवून दावा केला जोतो की, अब्दुल रझाक नामक व्यक्ती या बॉक्समधील बेकायदेशीर कुत्र्याचे मांस बंगळुरू शहरातील संपूर्ण हॉटेल्समध्ये पुरवतो.

युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “14 टन = 14,000 किलो कुत्र्याचे मांस बंगळुरूमध्ये सर्व हॉटेलांना पुरवण्यासाठी आणले. अब्दुल रझाक हा गुन्हेगार असून त्याला येथे रंगेहाथ पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेले पांढरे बॉक्स मेंढ्याच्या मांसाचे होते.

आज-तकने 27 जुलै रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, जयपुरवरून 150 पांढऱ्या डब्यांमध्ये तीन टन मांसाची खेप बेंगळुरू सिटी रेल्वे स्थानकावर आल्यावर हा गोंधळ उडाला होता. गोरक्षक पुनीत केरेहल्ली यांनी ते कुत्र्याचे मांस असल्याचा दावा केला होता.

तसेच मांस ऑर्डर करणारे अब्दुल रज्जाक (मांस विक्रेते) यांनी हा आरोप फेटाळून लावताना सांगितले की, “हे कुत्र्याचे मांस नसून मेंढीचे मांस आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे कायदेशीर कागदपत्रे आहेत. खोटे आरोप करून केरेहल्ली आपल्याकडून पैसे कमवू इच्छितात.”

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार पोलिसांनी बेंगळुरू सिटी रेल्वे स्थानकावर आलेले 90 इन्सुलेटेड बॉक्समधील 2,700 किलो मांस जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी तीन एफआयआर नोंदवले आहे.

पहिली एफआयआर अब्दुल रज्जाक यांच्या विरोधात कुत्र्याचे मांस विकण्याच्या अरोपात करण्यात आली होती. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे आणि गर्दी जमा केल्यामुळे पुनीत केरेहल्ली आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या विरोधात दोन एफआयआर करण्यात आली.

मूळ पोस्ट – टाईम्स ऑफ इंडिया

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी 31 जुलै रोजी ट्विट करत स्पष्ट केले की, “राजस्थानहून बेंगळुरूला रेल्वेने कुत्र्याच्या मांसाची वाहतूक केल्याचा आरोप करणाऱ्या अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनंतर, या प्रकरणाची शास्त्रीय पडताळणी करण्यासाठी, हैदराबादमधील ICAR-राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेकडे त्या मासाचे एकूण 84 पार्सल पाठवले. चाचणीनंतर पुष्टी करण्यात आली की, ते मांस कुत्र्याचे नसून मेंढ्यांचे आहे.

https://twitter.com/dineshgrao/status/1818581566257611105

खालील फोटोमध्ये आपण हैदराबादमधील ICAR-राष्ट्रीय मांस संशोधन संस्थेची रिपोर्ट पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील मांस कुत्र्याचे नाही. हैदराबादमधील ICAR-राष्ट्रीय मांस संशोधन संस्थाच्या विश्लेषणानुसार हे मांस मेंढ्यांचे होते. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:बंगळुरू स्टेशनवर पकडलेले मांस कुत्र्याचे नाही; भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False