सोलापूर – विजापूर महामार्गावरील टाकळी येथील पूल पुराच्या पाण्यात कोसळा, असा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. आधीच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसलेला असताना आता सोलापूर जिल्ह्यातही पूरपरिस्थिती उद्भभवल्याचे पाहून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, काळजी करण्याचे कारण नाही.

हा व्हिडियो सोलापूर जिल्ह्यातील टाकळी पूलाचा नाही.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ईमेलद्वारे संपर्क करून या व्हिडियोची तथ्य पडताळणी करण्याची विनंती केली होती.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक

काय आहे व्हिडियोमध्ये?

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर होत असलेल्या या 2.41 मिनिटांच्या व्हिडियोमध्ये नदीच्या पाण्याची पाणी पातळी वाढल्याने पूल कोसळताना दिसतो. हा पूल सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी गावातील पूल असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकवर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे.

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यात अशी काही घटना घडली का याचा शोध घेतला. सोलापूरपासून 30 किमी अंतरावर टाकळी हे गाव आहे. कर्नाटक सीमेलगतच्या या गावातून सोलापूर-विजापूर महामार्ग जातो. भीमा नदीवर या गावापाशी महामार्गाचा पूल आहे. एवढा मोठा पूल कोसळणे म्हणजे मोठी बातमी आहे. परंतु, कोणत्याही दैनिकात किंवा टीव्ही चॅनेलवर हा व्हिडियो किंवा अशी बातमी आढळली नाही.

फॅक्ट क्रेसेंडोने मग सोलापूरमधील पत्रकारांशी विचारणा केली. त्यांनीदेखील सदरील व्हायरल व्हिडियो टाकळी येथील नसून, अफवा पसरविली जात असल्याचे सांगितले. टाकळी पूल कोसळला नसल्याचीही त्यांनी माहिती दिली.

मग आम्ही टाकळी गावाच्या सरपंच सुशिला ख्यामगोंडे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सदरील व्हिडियो टाकळी पूलाचा नसल्याचे सांगितले. “हा व्हिडियो व्हायरल झाल्यावर मी स्वतः टाकळी पुलावर जाऊन खात्री केली. सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी पूल सुरक्षित आहे. कृपया करून अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे त्यांनी आवाहन केले.

लोकमतदेखील फेसबुकवर पुलाचा 13 ऑगस्ट रोजी काढलेला व्हिडियो शेयर केला आहे. यावरून स्पष्ट होते की, टाकळी पूल सुरक्षित आहे.

मग व्हायरल व्हिडियोतील की-फ्रेम्स निवडून गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून हा व्हिडियो गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणांचा म्हणून उपलब्ध असल्याचे कळाले. युट्यूबवर हाच व्हिडियो गुजरातमधील भावनगर, बिहारमधील कटिहार, आसाम यासह इतरही अनेक ठिकाणचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया आणि नवभारत टाईम्सने हा व्हिडियो बिहारमधील कटिहार येथील असल्याची बातमी केली होती. 14 ऑगस्ट 2017 रोजी पुराच्या पाण्यात कटिहार येथील पूल वाहून गेल्याचे बातमीत म्हटले होते. परंतु, हा पुल बिहारमधील नाही.

तो कसा?

अधिक शोध घेतल्यावर सर्वात जुन्या तारखेचा म्हणजे 2010 सालचा व्हिडियो सापडला.

एका युजरने 13 नोव्हेंबर 2010 साली युट्यूबवर अपलोड केला होता. त्याने सोबत लिहिले की, वन्सधारा नदीवरील हा गुमुडा पूल महापूरात दुसऱ्यांदा वाहून गेला.

https://www.youtube.com/watch?v=DTpoaolqt_Q

याविषयी अधिक शोध घेतला असता, आऊटलूक मॅगझीनने 7 ऑगस्ट 2007 रोजी दिलेली बातमी मिळाली. यामध्ये म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे दक्षिण ओडिशामधील सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला. रायागड जिल्ह्यातील गुमुडा येथील वन्सधारा नदीवरील पुल वाहून गेला. रायागडपासून 60 किमी अंतरावरील हा पूल पुराच्या पाण्यामुळे कोसळला होता. यामुळे बेहरामपूर जिल्ह्याचा रायागड, कोरापूत आणि मल्कानगिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला होता, अशी माहिती तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी रंजन शर्मा यांनी पीटीआयला दिली होती.

मूळ बातमी येथे वाचा – OUTLOOK

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 1980 साली बांधण्यात आलेला हा पुल 2007 साली पुरात वाहून गेला होता. त्यानंतर या पुलाचे पुनर्निर्माण करण्यात आले.

रायागडचे जिल्हाधिकारी प्रमोद कुमार बेहरा यांनी गुमुडा पुल 2007 साली कोसळल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. गुमुडापासून जवळील गुनपुर येथील अग्नीशामक दलाशी संपर्क केला असता, त्यांनी गुमुडा पूल कोसळला होता अशी माहिती. यासंबंधी अधिक माहिती जमा करून पाठवण्यात येईल असेही त्यांनी आम्हाला सांगितले. ती माहिती मिळताच येथे अपडेट करण्यात येईल.

निष्कर्ष

सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी पूल सुरक्षित असून, तो पुराच्या पाण्यात कोसळलेला नाही. महापुरात पुल कोसळण्याचा व्हायरल व्हिडियो अनेक वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. सर्वात जुना 2010 साली अपलोड करण्यात आलेला व्हिडियो ओडिशामधील रायागड जिल्ह्यातील वन्सधारा नदीवरील गुमुडा पुल कोसळतानाचा म्हटले आहे. अद्याप याची खात्री पटलेली नाही.

Avatar

Title:सोलापूर-विजापूर महामार्गावरील टाकळी पूल कोसळलेला नाही. त्या व्हिडियोवर विश्वास ठेवू नका.

Fact Check By: Agastya Deokar

Result: False