
नाशिक येथे नुकेतच पार पडलेल्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी वादग्रस्त दावा केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा प्रार्थना करतानाचा फोटो शेअर करून म्हटले जात आहे की, मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुराणातील आयत पठण करण्यात आले होते.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा फोटो मराठी साहित्य संमेलनातील नाही आणि संमेलनाचे उद्घाटनसुद्धा आयत वाचून झाले नव्हते.
काय आहे दावा?
पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांचा फोटो शेअर करून लिहिले की, “साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच सरस्वती पूजन बंद करून नवीन प्रथा चालू…महाराष्ट्र सरकारने नवी प्रथा सुरू केली आहे. पहिले साहित्या संमेलनाची सुरुवात सरस्वती वंदनने होत असे. आता साहित्य संमेलनाची सुरुवात कुरानातील आयत वाचू होऊ लागली आहे.”

हाच दावा आणि फोटो फेसबुकवरसुद्धा खूप व्हायरल आहे.

मूळ लिंक – फेसबुक
तथ्य पडताळणी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिक जवळील आडगाव येथे पार पडले. शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले होते. या उद्घाटन प्रसंगी कादंबरीकार विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, खासदार श्रीनिवास पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या इतर मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे अनेक टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्रांचे युट्यूब व फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता. त्यातून लगेच स्पष्ट होते की, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे दोघेही उपस्थित नव्हते.
या कार्यक्रमाला उपस्थित विविध पाहुणे आणि पत्रकारांनी माहिती दिली की, कार्यक्रमाची सुरुवात कुराणातील आयत वाचून झाली नव्हती.
प्रत्यक्षात कार्यक्रमाची सुरुवात “गर्जा जयजयकार” या कुसुमाग्रज लिखित गीताने झाली होती. त्यानंतर मिलिंग गांधी यांनी लिहिलेल्या संमेलनगीताचे संजय गिते यांनी सादरीकरण केले होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन पार पडले.
ALSO READ: शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा एकत्र? काय आहे या फोटोचे सत्य?
मग जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिय सुळे यांचा हा फोटो नेमका कुठला आहे?
हा फोटो ठाणे महानगरपालिचे परिवहन समिती सदस्य श्री. शमीम खान यांच्या मुलीच्या निकाह सोहळ्यातील आहे. या लग्नाला सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड दोघेही 4 डिसेंबर रोजी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून या निकाहचा व्हिडिओ लाईव्ह प्रक्षेपित केला होता. त्यात स्पष्ट दिसते की, लग्नाच्या वेळी उपस्थित सर्वच पाहुण्यांनी दुआ अदा केली होती.
मूळ व्हिडिओ – फेसबुक
ALSO READ: हा खरंच 201 वर्षांच्या समाधिस्थ बौद्ध भिक्खूंचा फोटो आहे का? वाचा सत्य
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांचा दुआ करतानाचा तो फोटो एका निकाह सोहळ्यातील आहे. तो मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनातील नाही. तसेच संमेलनाची सुरुवात कुराणातील आयत पठन करून झाली नव्हती. हा दावा साफ खोटा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कुराणातील आयत वाचून झाले होते का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
