लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे सत्र सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते “सत्तधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा,” असे सांगत आहेत.

विरोधी पक्षात असूनदेखील उद्धव ठाकरे सत्तधारी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची (विभाजन होण्यापूर्वीची शिवसेना) युती होती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “तुम्ही नरेंद्र भाईंना नाहीतर तुमच्या भवितव्याला मत देत आहात, तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात, केवळ आमचे उमेदवार जिंकले पाहिजे आणि नरेंद्र भाई पंतप्रधान व्हावे म्हणून मी हे बोलत नाही. तर पूर्ण विचार करून आपण पुढे चाललो आहोत, देशाला मजबूत सरकार आणि विश्वसनीय चेहरा, यातच देशाचे भवितव्य आहे आणि ते आपल्याकडे आहे पलिकडे काहीही नाही.”

व्हिडिओच्या ग्रफिकमध्ये लिहिले होते की, "भाजपचे स्टार प्रचारक उद्धव ठाकरे. अरेच्चा ! मोदी सरकारला भाडोत्री सरकार म्हणणारे चक्क त्यांचा प्रचार करतायेत."

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आताच्या घडीमध्ये उद्धव ठाकरेंनी असे आवाहन केले असते तर ही एक मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमांवर अशी बातमी आढळली नाही.

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 9 वर्षांपूर्वीचा असून मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवरील महायुतीचं शक्तीप्रदर्शन सभेचा आहे.

शिवसेना(उद्धव ठाकरे) आणि भाजप या दोन्ही पक्षाची 2014 मध्ये युती होती.

भाजपने आपल्या आधिकृत युट्यूब चॅनलवर 21 एप्रिल 2014 रोजी या सभेचे थेट प्रक्षेपण केले होते.

या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करतात आणि भाजपला मतदान करण्याचे जनतेला आवाहन करतात.

https://www.youtube.com/live/4iR8Cz3hfEU?si=JzW71M1dhLLXfqu3&t=2806

उद्धव ठाकरेंनीदेखील या भाषणाचा हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर शेअर केला होता. या व्हिडिओच्या स्रीनशॉर्टमध्ये आपण देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे आणि नरेंद्र मोदींना पाहू शकतो.

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह (स्रीनशॉर्ट)

शिवसेना-भाजप महायुती

शिवसेना आणि भाजप यांची सर्वात पहिल्यांदा युती ही 1984 च्या लोकसभा निवडणुकीत झाली होती. परंतु, इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक काँग्रेस जिंकली आणि परभवाचे विश्लेषण करताना ‘शिवसेनेशी युती केल्यामुळेच भाजपच्या पदरी परभवाची नामुष्की आली’ असा मुद्दा भाजपचे उमेदवार राम जेठमलानी यांनी मांडला आणि परिणामी युती तुटली.

प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नातुन 1989 मध्ये भाजप- शिवसेनेची परत युती झाली आणि ती टिकून राहिली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 41 ते 42 खासदार निवडून आले होते. अधिक महिती येथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून 9 वर्षांपूर्वीचा आहे. 2014 मध्ये भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे) महायुती असताना उद्धव ठाकरेंनी भाजपला मतदान करण्याचे जनतेला आवाहन केले होते. खोट्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Avatar

Title:उद्धव ठाकरेंनी मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असे म्हटले का ?

Written By: Sagar Rawate

Result: Misleading