
दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉनच्या जंगलाला भीषण आग लागलेली आहे. मागील तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत असून नैसर्गिक संपत्तीचे आतोनात नुकसान झाले आहे. संपर्ण जगाला सुमारे 20 टक्के शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या या जंगलाला असे आगीत भस्मसात होताना पाहून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण आगीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर होत आहेत.
अनेक सेलिब्रेटिंनी जंगल जळतानाचे फोटो अपलोड करून चाहत्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. परंतु, असे करीत असताना त्यांनी अॅमेझॉनच्या जंगलातील आगीचे फोटो समजून जुने आणि संदर्भहीन फोटो शेयर केले. फॅक्ट क्रेसेंडोने या फोटोंची पडताळणी केली. गुगल रिव्हर्स इमेज सर्चद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, खालील सहा फोटो सध्या अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीचे नाहीत.

फोटो क्र. 1
जंगलाला लागलेल्या आगीचा आकाशातून घेतलेला हा फोटो तब्बल 30 वर्षे जुना आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्या वर इंडिपेडेंट न्यूज वेबसाईटवर हा फोटो सापडला. येथे दिलेल्या कॅप्शनमध्ये हा फोटो रेक्स या इमेज वेबसाईटवरून घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार शोध घेतल्यावर रेक्स फीचर नावाच्या वेबसाईटवर खाली दिलेला फोटो आढळला. हा फोटो सिपा प्रेस नावाच्या छायाचित्रकाराने 1989 साली ब्राझीलमध्ये घेतला होता. म्हणजे हा फोटो या वर्षी लागलेल्या आगीचा नाही. अगदी जगप्रसिद्ध गायिका मॅडोनानेसुद्धा हा फोटो शेयर केला होता.

मूळ फोटो येथे पाहा – Rex Features
फोटो क्र. 2
इको बिझनेस वेबसाईटवरील माहितीनुसार, हा फोटो ब्राझीलमधील साऊ फेलिक्स डो क्षिंगू भागात ऑगस्ट 2008 साली लागलेल्या आगीचा आहे. ग्रीनपीस या संस्थेकरिता छायाचित्रकार डॅनियल बेल्ट्रा यांनी तो टिपला होता. याचाच अर्थ की हा फोटो सुमारे 11 वर्षांपूर्वीचा आहे.

मूळ फोटो येथे पाहा – ग्रीनपीस
फोटो क्र. 3
जंगलात पेटलेल्या भीषण वणव्यामुळे उंच उंच उठलेल्या धुराचा हा फोटो फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉ यांनी शेयर केला होता. परंतु, हा फोटोसुद्धा सध्या पेटलेल्या वणव्याचा नाही. अलामी या फोटो संस्थेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार हा फोटो लोरेन मॅकइन्टायर यांनी काढलेला आहे. त्यांनी हा फोटो नेमका कधी घेतला याचा जरी उल्लेख नसला तरी, लोरेन यांचा 2003 सालीच मृत्यू झालेला आहे. याचा अर्थ हा फोटो त्याआधीच घेतलेला आहे.

मूळ फोटो येथे पाहा – Alamy
फोटो क्र. 4
जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो याने हा फोटो शेयर केला होता. आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो तर सहा वर्षे जूना आहे. दक्षिण ब्राझीलमधील Taim Ecological Station येथे 2013 साली लागलेल्या आगीचा हा फोटो आहे. सुमारे 1400 एकर जागेवर पसरलेल्या आगीचा हा एरियल व्ह्यूव फोटो लाऊरो अॅल्व्हज् यांनी 27 मार्च 2003 रोजी काढला होता.

मूळ फोटो येथे पाहा – गेटी इमेजेस
फोटो क्र. 5
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर हफपोस्ट वेबसाईटवरील एक लेख समोर येतो. यामध्ये हा फोटो वापरलेला आहे. त्याखालील कॅप्शनमध्ये हा फोटो गेटी इमेजेसद्वारे घेतल्याचे म्हटले आहे. गेटी इमेजसवर शोध घेतल्यावर खाली दिलेला फोटो मिळाला. त्यासोबतच्या माहितीनुसार हा फोटो ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या खोऱ्यात 2014 साली लागलेल्या आगीचा आहे. छायाचित्रकार मारिओ तामा यांनी 22 नोव्हेंबर 2014 रोजी हा फोटो काढला होता.

मूळ फोटो येथे पाहा – गेटी इमेजेस
फोटो क्र. 6
गिझमोडो वेबसाईटवर हा फोटो वापरण्यात आला आहे. तेथील माहितीनुसार हा फोटो विकिमीडिया येथून घेण्यात आला होता. विकिमीडिया येथे तपासले असता हा फोटो जॉन मॅकोलगन यांनी 6 ऑगस्ट 2000 साली काढला होता. अमेरिकेतील मॉन्टॅना येथील बिटररूट नॅशनल पार्कमध्ये लागलेल्या भीषण आगीदरम्यान तो घेण्यात आला होता. म्हणजे हा 19 वर्षे जूना फोटो अॅमेझॉनच्या जंगलाचा नसून, अमेरिकेतील आहे.

मूळ फोटो येथे पाहा – विकिमीडिया
फोटो क्र. 7
न्यूज-18 लोकमत चॅनेलच्या वेबसाईटवर हा फोटो शेयर करण्यात आला आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर बिझनेस इनसायडर वेबसाईटवरील 28 जून 2019 रोजीची बातमी सापडली. यानुसार, हा फोटो स्पेनमधील माईल्स भागातील जंगलात पेटलेल्या वणव्याचा आहे. छायाचित्रकार अल्बर्ट गेई यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी 27 जून रोजी हा फोटो काढला होता.

मूळ फोटो येथे पाहा – बिझनेस इनसाईडर
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, सोशल मीडियावर शेयर करण्यात येणारे हे फोटो अॅमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या आगीचे नाही. यांपैकी काही जूने आणि काही इतर ठिकाणचे आहेत. असे असले तरी अॅमेझॉनच्या जंगलात पेटलेल्या वणव्याची बातमी खरी आहे. या फोटोंची पडताळणी करण्याचा उद्देश केवळ वाचकांना फोटोंची सत्यता सांगणे एवढाच आहे.

Title:अॅमेझॉनच्या जंगलातील आगीचे फोटो म्हणून जुने आणि संदर्भहीन फोटो व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
