
जगभरात कुंग-फू, कराटे हा प्रकार लोकप्रिय करण्यात ब्रुस ली या प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा हात आहे. त्यांचे कराटे कौशल्य, शारीरिक चपळता आणि शक्ती याचे अनेक किस्से आणि दंतकथा सांगितल्या जातात. त्याचा वन-इंच पंच हा तर जगप्रसिद्ध आहे. चार-पाच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 1973 साली त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूविषयीसुद्धा अनेक तर्कवितर्क लढविले जातात.
तर अशा या मिथकांनी भरलेल्या ब्रुस लीचा सध्या एक व्हिडियो व्हायरल होत आहे. यामध्ये दावा केला जातोय की, ननचक्सच्या सहाय्याने ब्रुस ली टेबल टेनिस खेळत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी करून सत्य जाणून घेतले.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक
काय आहे व्हिडियोमध्ये?
एक मिनिटांच्या या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडियोमध्ये दोन खेळाडू टेबल टेनिस खेळत आहेत. एकाच्या हातात सामान्य बॅट आहे तर, ब्रुस ली सदृश्य व्यक्तीच्या हातात ननचक्स आहे. तो ननचक्सचा वापर करून येणाऱ्या चेंडूला टोलावताना यामध्ये दिसते. सोबत लिहिले की, “अप्रतिम क्लीप! 1970 ब्रूस ली टेबल टेनिस त्याच्या ननचक्स बरोबर खेळत असताना…A priceless clip of 1970 of Bruce Lee playing Table Tennis with his Nanchak! His focus on speed, reflexes and accuracy was absolutely incredible.”
तथ्य पडताळणी
हा व्हिडियो नक्की कोणाचा आहे याचा शोध घेण्यासाठी गुगलवर Bruce Lee Playing Tennis With Nunchucks असे सर्च केले. तेव्हा अॅडवीक नावाच्या संकेत स्थळावरील एक लेख समोर आला. यामध्ये पाच अशा जाहिरातींची माहिती दिली आहे ज्या लोकांना खऱ्या घटना वाटतात. त्यापैकी एक हा ब्रुस ली ननचक्सच्या सहाय्याने टेबल टेनिस खेळत असल्याच्या व्हिडियोचाही समावेश आहे.

मूळ लेख येथे वाचा – अॅडवीक
वेबसाईटवरील माहितीनुसार, नोकिया कंपनीच्या N-96 ब्रुस ली एडिशन मोबाईलची ही जाहिरात आहे. जे.डब्ल्यू.टी. सिंगापूर नावाच्या कंपनीने 2008 साली ती तयार केली होती. ब्रुस लीसारखा दिसणारा एक कराटे एक्सपर्टला घेऊन स्पेशल इफेक्टद्वारे हा व्हिडियो चित्रित करण्यात आला होता. म्हणजे या व्हिडियोत जो दिसतोय तो ब्रुस ली नाही. तसेच, स्पेशल इफेक्ट्द्वारे टेबल टेनिसचा बॉल टाकण्यात आला. म्हणजे हा कलाकार खरोखरं ननचकद्वारे टेबल टेनिस खेळत नाहीए. व्हिडियो ब्लॅक अँड व्हाईट आणि जून्या काळातील भासत असल्यामुळे अनेक लोक हे खरं मानतात.
गुगलवर या जाहिरातीचा ओरिजनल व्हिडियो उपलब्ध आहे. ती तुम्ही खाली पाहू शकता. व्हायरल होत असलेला व्हिडियोतून नोकिया फोनची जाहिरात एडिट करून कापण्यात आलेली आहे.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, ब्रुस ली ननचक्सद्वारे टेबल टेनिस खेळत असल्याचा दावा खोटा आहे. हा व्हिडियो मूळात नोकिया मोबाईलची जाहिरात (2008) आहे. ब्रुस लीच्या चेहऱ्याशी साम्य असणाऱ्या कलाकाराला घेऊन स्पेशल इफेक्ट्सद्वारे हा व्हिडियो तयार करण्यात आला होता.

Title:ब्रुस लीचा ननचक्सद्वारे टेबल टेनिस खेळतानाचा व्हिडियो खरा नाही. ती नोकिया मोबाईलची जाहिरात आहे
Fact Check By: Agastya DeokarResult: False
