
मराठी भाषा दिनानिमित्त अनेक वर्तमानपत्र, संकेतस्थळे आणि सोशल मीडियावर अशी माहिती पसरविली जाते की, पाकिस्तानमधील कराची शहरात आजही मराठी शाळा सुरू आहे. आणि तिचे नाव नारायण जग्गनाथ वैद्य विद्यालय आहे. स्वातंत्र्यापूर्वी हजारो मराठी भाषिक नागरिक पाकिस्तानातील सिंध प्रांतामध्ये राहात होते आणि आजही आहेत. त्यामुळे कदाचित तेथे मराठी शाळा असेल अशी अनेकांना वाटते. फॅक्ट क्रेसेंडोने याबद्दल सखोल तपास केला.
इन मराठी नामक पोर्टलने 27 फेब्रुवारी 2019 रोजी “पाकिस्तानातील मराठी शाळा – नारायण जगन्नाथ विद्यामंदिर!” अशी बातमी दिली. त्या आधी गेल्या वर्षी दिव्य मराठीने देखील अशीच बातमी प्रसिद्ध केली होती.

इन मराठीची ही बातमी त्यांच्या फेसबुक पेजवरदेखील पोस्ट करण्यात आली आहे. पडताळणी करेपर्यंत या पोस्टला 456 शेयर आणि तीन हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या. याव्यतिरिक्त अन्य फेसबुक पेजवरूनदेखील ही लिंक शेयर करण्यात आली आहे.
तथ्य पडताळणी
इन मराठीच्या बातमीमध्ये म्हटले आहे की, सिंध प्रांताची पूर्वीची राजधानी कराचीमध्ये राहणाऱ्या मराठी भाषकांच्या पुढाकारातून तेथे एक मराठी शाळा सुरू करण्यात आली होती. मुंबईचे नारायण जगन्नाथ वैद्य यांना या शाळेत शिकविण्यासाठी बोलवले होते. त्यांच्या सन्मानार्थ या शाळेला त्यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे कराचीतील ही शाळा नारायण जग्गनाथ विद्यामंदिर म्हणून ओळखली जाते.

मूळ बातमी येथे वाचा – इन मराठी । अर्काइव्ह
दिव्य मराठीच्या बातमीतही वरीलप्रमाणेच दावा करण्यात आला आहे. मूळ बातमी येथे वाचा – दिव्य मराठी । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोन सर्वप्रथम गुगल वर – Narayan Jagannath Vaidya School Karachi – असे सर्च केले. तेव्हा अशा नावाची एक शाळा कराचीमध्ये असल्याचे आढळले. या शाळेच्या अधिकृत वेबसाईटवर आम्ही गेलो. ही शाळा कराचीच्या एम. जिन्हा रोडवर स्थित असून तिचे नाव NJV Government Higher Secondary School असे आहे.
शाळेच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार ही शाळा 1855 साली सर बर्टल फ्रेअरी यांनी स्थापन केली होती. सिंध प्रांतातील ही पहिली सरकारी शाळा होती. राव नारायण जगन्नाथ वैद्य यांनी सिंध प्रांतामध्ये शिक्षणाला चालना देण्यासाठी केलेल्या अनन्यसाधारण कार्याचा गौरव म्हणून या शाळेला त्यांचे नाव देण्यात आले. Akhuwat या संस्थेने सिंध प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या सहकार्याने 2015 पासून ही शाळा दत्तक घेतली आहे.

मग आम्ही शाळेच्या प्रवेश प्रक्रिया पेजवर गेलो. तेथे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, ही इंग्रजी माध्यम शाळा आहे. म्हणजे ही मराठी शाळा नाही.

या शाळेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोने अधिक सखोल तपास केला. तेव्हा पाकिस्तानमधील प्रतिष्ठित वृत्तस्थळ डॉन येथे अख्तर बलोच यांनी या शाळेवर लिहिलेला एक लेख आढळला. यामध्ये 1987 सालच्या एका पत्राचा उल्लेख करताना बलोच यांनी या शाळेचा सिंधी माध्यम असा उल्लेख केला आहे.

मूळ बातमी येथे वाचा – डॉन । अर्काइव्ह
याच बातमीमध्ये जे. डब्ल्यू स्मिथ यांनी संकलित केलेल्या सिंध प्रांताच्या गॅझेटचा (1919) संदर्भ देण्यात आला आहे. आम्ही ते गॅझेट तपासले. यामधील पान क्रमांक 37-38 वर लिहिले आहे की, ही शाळा ऑक्टोबर 1855 साली सुरू झाली होती. सिंध प्रांतातील ही पहिली सरकारी शाळा होती. सिंध प्रांतामध्ये जेव्हा शिक्षक आणि पुस्तकांचा अभाव होता तेव्हा श्री. नारायण जग्गनाथ यांनी येथे ज्ञानगंगा आणण्याचे काम केले. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल या शाळेला त्यांचे नाव देण्यात आले.

मूळ गॅझेट येथे वाचा आणि डाऊनलोड करा – सिंध प्रांत गॅझेट (1919)
दरम्यान, ए. डब्ल्यू. ह्यूज यांनी संकलित केलेल्या सिंध प्रांताच्या गॅझेटमध्ये (1876) या शाळेचे Government High School आणि Anglo-Vernacular असे दोन भाग होते असे दिले आहे. दोन्हींमध्येही इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जायचे (पान क्र. 370). म्हणजे या शाळेमध्ये सुरुवातीपासून मराठीमधून शिक्षण दिले जात नव्हते.
मूळ गॅझेट येथे वाचा आणि डाऊनलोड करा – सिंध प्रांत गॅझेट (1876)
लोकसत्ता वृत्तस्थळावर डॉ. रुपाली मोकीशी यांनी 29 मे 2016 रोजी लिहिलेल्या एका लेखात नारायण वैद्य यांच्याविषयी माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, “सुरुवातीला या शाळेचे नाव ‘नारायण जगन्नाथ हायस्कूल’ असे होते. १९३९ मध्ये मुंबईतील बॅ. सी. डी. वैद्य या त्यांच्या नातवाच्या विनंतीवरून शाळेचे नाव ‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’ असे केले गेले. आज कराचीमध्ये ही शाळा ‘एन. जे. व्ही.’ या नावाने ओळखली जाते.” या लेखातही ही मराठी शाळा आहे, असे म्हटलेले नाही.
मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
मग कराचीमध्ये कधी मराठी शाळा होती का?
सिंध प्रांताच्या गॅझेटमध्ये (1876) मध्ये पान क्रमांक 371 वर कराचीमध्ये त्याकाळी 2 मराठी शाळा असल्याचा उल्लेख आहे. कराचीतील मराठी शाळा मिशन रोडवर सिव्हिल हॉस्पिटलसमोर होती. सरकार आणि तेथील मराठी भाषिकांनी एकत्र मिळून त्याकाळात दोन हजार रुपये खर्चून ही शाळा बांधली होती (पान क्र. 372). म्हणजे ती एनजेव्ही शाळेपेक्षा वेगळी होती.

मग प्रश्न राहतो की, नारायण जग्गनाथ वैद्य या शाळेत शिकवत होते का?
सिंध प्रांताच्या गॅझेटमध्ये (1876) मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, ते शिक्षण उपनिरीक्षक (Deputy Education Inspector) होते. म्हणजे ते शिक्षक नव्हते. त्यांनी सिंधी भाषेच्या खुदाबादी लिपीतील त्रुटी सुधारणा केल्या (पान क्र. 373). लोकसत्ताच्या लेखातही याचा उल्लेख आहे.
निष्कर्ष
गॅझेट (1876, 1919), शाळेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, कराची येथे असलेली नारायण जग्गनाथ वैद्य विद्यालयात (एनजेव्ही हायस्कूल) मराठी नाही तर इंग्रजीतून शिकविले जाते. म्हणून इन मराठीची बातमी असत्य आहे.

Title:पाकिस्तानमध्ये खरंच मराठी शाळा आहे का? जाणून घ्या सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
