
काश्मीरमधून एका जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची खळबळजनक बातमी सोशल मीडिया आणि वृत्तस्थळांवर पसरत आहे. यामध्ये दावा करण्यात आला की, सुटीवर आलेल्या एका जवानाला शस्त्रधारी दहशतवादी घरातून घेऊन गेले.
अनेक वृत्तपत्रांनी 8 मार्चला रात्री उशिरा ही बातमी प्रसिद्ध केली.

फेसबुक पेजवरूनदेखील ही बातमी मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात आली. फॅक्ट क्रसेंडोने या बातमीची तथ्य पडताळणी केली.
तथ्य पडताळणी
लोकसत्ताने 8 मार्चला रात्री 11.50 वाजता दिलेल्या बातमीत एएनआयचा दाखला देत म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील काझीपुरा चाडुरा गावामधील भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचे शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरातून हे अपहरण करण्यात आल्याची तक्रार यासीनच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये केली. यासीन हे २६ फेब्रुवारी रोजी सुट्टीवर घरी आले होते.

मूळ बातमी येथे वाचा – लोकसत्ता (अर्काइव्ह) । सामना (अर्काइव्ह) । न्यूज 18 लोकमत (अर्काइव्ह)
टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानुसार, “जवानाच्या अपहरणानंतर भारतीय लष्कराने त्यांच्या शोधात सर्च ऑपरेशन सुरु केले. जवान मोहम्मद यासीन यांना त्यांच्या घराजवळील जंगलाच्या दिशेने नेण्यात आल्याची माहिती यासीन यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.”
मूळ बातमी येथे वाचा – टीव्ही 9 मराठी । अर्काइव्ह
एएनआयने 8 मार्च रोजी खालील ट्विट करून या अपहरणाची बातमी दिली होती. यानुसार, जाकली युनीटमधील जवान मोहम्मद यासीन भट यांचे शुक्रवारी सायंकाळी उशीरा काझीपुरा चाडुरा येथील त्यांच्या रहात्या घरातून दहशतवाद्यांनी अपहरण केले.
फॅक्ट क्रेसेंडोने एएनआयची मूळ बातमी तपासली. त्यामध्ये कुठेही यासीनच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिल्याचे म्हटलेले नाही. त्यात केवळ एवढेच दिले आहे की, जाकली युनीटमधील जवान मोहम्मद यासीन भट यांचे शुक्रवारी काझीपुरा येथील घरातून दहशतवाद्यांनी अपहरण केले. रायफलमॅन असणारे यासीन एका महिन्याच्या (मार्च) सुटीवर घरी आले होते.

मूळ बातमी येथे वाचू शकता – एएनआय । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोने बडगाम जिल्हा पोलीस कार्यालयाशी संपर्क केला असता एसपी अमोद नागपुरे यांनी यासीनच्या कुटुंबियांनी अशी कोणतीही तक्रार दिली नसल्याचे सांगितले.
मग खरंच यासीन भटचे अपहरण झाले का?
भारतीय संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सकाळी जवानाचे अपहरण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. मंत्रालय प्रवक्त्याच्या अधिकृत ट्विटर हँडरवरून स्टेटमेंट दिले की, सुटीवर असणाऱ्या भारतीय जवानाचे बडगाम जिल्ह्यातील काझीपुरा, चाडुर गावातून अपहरण झाल्याचे वृत्त खोटं आहे. तो जवान सुखरुप असून, यासंबंधी कोणतेही ठोकताळे बांधू नयेत.
यानंतर स्वतः एएनआयनेदेखील रक्षा मंत्रालयाचा हा खुलासा ट्विट केला.
यानंतर माध्यमांनीदेखील जवानाच्या अपहरणाच्या बातम्या असत्य असल्याचे सांगत रक्षा मंत्रालयाचा दाखला दिला. लोकसत्ता आणि सामनानेदेखील अशा बातम्या दिल्या. परंतु, त्यांनी मूळ बातमीमध्ये सुधारणा करण्याऐवजी नवी बातमी दिली. त्यामुळे अपहरण झाल्याच्या बातमीची लिंक सोशल मीडियावर फिरत होती.
सुधारीत बातमी येथे वाचा – लोकसत्ता (अर्काइव्ह) । सामना (अर्काइव्ह)
निष्कर्ष
संरक्षण मंत्रालयाच्या स्टेटमेंटनंतर हे स्पष्ट झाले की, भारतीय जवानाचे अपहरण झालेले नाही. अनेक वृत्तस्थळांनीदेखील वेगळ्या बातमीतून हा खुलासा केला असला तरी, त्यांनी मूळ बातमीमध्ये बदल किंवा याची सूचना दिलेली नाही. त्यामुळे अपहरण झाल्याची मूळ बातमी असत्य आहे.

Title:तथ्य पडताळणीः आर्मीच्या जवानाचे घरात घुसून अपहरण? काय आहे सत्य
Fact Check By: Mayur DeokarResult: False
