सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही लोक एका व्यक्तीला खांदा देत घेऊन जाताना सायरनचा आवाज येतो आणि खांदेकरी व तो व्यक्ती तेथून पळ काढतात.

दावा केला जात आहे की, इस्रायल-हमास संघर्षादरम्यान गाझापट्टीमध्ये राहणारे काही पॅलेस्टिनी लोक मृत्यूचे नाटक करत खोटी अंतयात्रा काढून जगासमोर स्वत:ला पीडित आणि शोषित दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ इस्रायल-हमास युद्धाशी संबंधित नाही.

काय आहे दावा ?

व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “संपूर्ण जगाला स्वत:ला पीडित दाखवण्यासाठी हमासचे लोक जिवंत मुलाला तिरडीवर झोपवून घेऊन जातानाचा व्हिडिओ बनवत आहेत आणि इस्त्रायली सायरन ऐकताच जनाज्याला तिथेच सोडून पळून गेले. काही वेळाने मुडदा पण उभा राहून पळून गेला. विक्टीम कार्ड हे खेळण्यात निपुण आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, रोया न्यूज इंग्रजी या वृत्तपत्राच्या अधिकृत फेसबुक पेजवर 23 मार्च 2020 रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ही अंतयात्रा बनावट असून इशारे देऊनही लोक कायद्याचे उल्लंघन करीत आहेत.”

हा घागा पकडून अधिक सर्च केल्यावर दुबईच्या अलरोया वृत्ताने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर ही बातमी शेअर केल्याचे आढळले. या बातमीमध्ये माहिती दिली होती की, ‘जॉर्डनमध्ये कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना काही लोक घराबाहेर निघण्यासाठी खोटी अंतयात्रा काढण्याचा प्रयत्न करीत होते.’

https://youtu.be/_u1_Dd-0II8?si=ZYFvOQy7XCmy-zBK

या पूर्वीदेखील 2021 मध्ये हा व्हिडिओ ‘गाझामधील फेक अंतयात्रा’ म्हणून व्हायरल झाला होता. तेव्हा बीबीसीने या दाव्याचे खंडण करत सांगितले की, व्हायरल व्हिडिओ गाझाचा नसून जॉर्डनचा आहे. सविस्तर बातमी येथे वाचू शकतात.

सध्याची परिस्थिती

हमासने युद्ध पुकारल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. तसंच, इस्रायलने तेथील मानवतावादी सुविधाही खंडित केल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिक जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी स्थायिक होत आहेत.

या दरम्यान, गाझातील अल-अहली या सिटी रुग्णालयात भीषण मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात तब्बल 500 जणांचा मृत्यू झाला. अधिक माहिता आपण येथे पाहू शकतात.

https://youtu.be/HGG8R8t7cCo?si=LwavGGEQR93tjH3E

निष्कर्ष

या वरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा खोटा आहे. ही अंतयात्रा गाझापट्टीत काढण्यात आली नव्हती. 2020 साली जॉर्डनमध्ये कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान लोकांनी घराबाहेर पडण्यासाठी अशी शक्कल लढविली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:जॉर्डनमधील कोरोना काळातील खोट्या अंतयात्रेचा जुना व्हिडिओ गाझाच्या नावाने व्हायरल

Written By: Sagar Rawate

Result: False