
कोरोना व्हायरसने आतापर्यंत चीनमध्ये शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो नागरिकांना याची लागण झाली आहे. भारतातही केरळमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण दाखल आहेत. कोरोना व्हायरसबद्दल सर्वसामान्यांमध्ये भितीचे झाले वातावरण असतानाच समाजमाध्यमात यावर विविध उपाय सुचविणारे संदेश व्हायरल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैभव सोनार यांनी असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक वैद्यकीय तज्ञ कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणाऱ्या औषधाविषयी माहिती देण्यात आली आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
कोरोना व्हायरसला Arsenicum album30 हे औषध खरोखरच प्रतिबंध करते का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओत दिसणाऱ्या डॉ. राहुल गोंदलीया यांच्याशी संपर्क साधला. डॉ. राहुल गोंदलीया म्हणाले की, हे औषध केवळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुचित केले आहे. हे औषध घेतल्यावर कोरोना व्हायरसची लागण होणारच नाही, असे 100 टक्के म्हणता येणार नाही. डॉ. राहुल गोंदलीया यांनी केलेल्या या खुलाशानंतर आम्ही तपास आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला पत्र सुचना कार्यालयाचे 29 जानेवारी 2020 रोजीचे खालील ट्विट दिसून आले.
पत्र सुचना कार्यालयाने हे ट्विट केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने याचा खुलासा करत याप्रकारची कोणतीही औषध उपाययोजना उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले. यासाठीचे संशोधन सुरू असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने वेळोवेळी स्पष्ट केले आहे.
खुद्द पत्र सुचना कार्यालयानेही 4 फेब्रुवारी 2020 रोजी याबाबत स्पष्टीकरण देत कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध सुचविले नसल्याचे सांगितले. या औषधांचा वापरही वैद्यकीय सल्ल्यानेच करावा, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
या संशोधनातून हे स्पष्ट होत आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूसाठी कोणतेही औषध उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आरोग्य विभागाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनीही जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूसाठी कोणतेही औषध उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले सांगितले आहे.
निष्कर्ष
कोरोना विषाणूला प्रतिबंध करणारे कोणतेही औषध सध्या उपलब्ध नाही. यासाठीचे संशोधन सुरू असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Corona Virus : कोरोना व्हायरसला हे होमिओपॅथिक औषध प्रतिबंध करते का, वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
