सत्य पडताळणी : पवारांच्या नातलगांनी लष्कराची 70 कोटींची जमीन घेतली का?

Mixture/अर्धसत्य

(छायाचित्र सौजन्य : लोकसत्ता)

शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांचे नातलग आणि जवळचे मित्र यांच्या Tech Park One कंपनीने पुण्यात लष्कराची ७० कोटी रुपयांची जमीन केवळ ७ कोटी रुपयांत विकत घेण्याचा विक्रम केला होता, अशी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विसरला नाही महाराष्ट्र या हॅशटॅगने ही बातमी शेअर करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

Tech Park One कंपनी काय आहे याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. पुण्यातील येरवडा भागातील शास्त्रीनगर येथील ते एक आयटी पार्क असल्याचे पडताळणीत आम्हाला आढळून आले. पुण्यातील पंचशील टेक पार्कचाच तो एक भाग असल्याचेही दिसून आले.

आक्राईव्ह लिंक

गुगल मॅपवर आम्हाला याचे लोकेशन पुण्यात नगर रोडवरील लूप रोडवर असल्याचे दर्शविण्यात आले. हा भाग लष्कराच्या अखत्यारित येत नसल्याचेही आम्हाला आढळून आले.

त्यानंतर आम्ही Tech Park One कंपनी अस्तित्वात आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या नावाने ही कंपनी अस्तित्वात असल्याचे आम्हाला आढळले नाही. यानंतर आम्ही आमची पडताळणी पुढे नेत याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी काय संबंध आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने 23 जुलै 2014 रोजी पुण्यातील जमीन घोटाळ्यात बड्या धेंडांवर 25 वर्षांनी गुन्हा नोंदवला, अशा शीर्षकाने एक वृत्त दिल्याचे आढळले. या वृत्तात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या सुरुवातीच्या काही वर्षे पंचशील टेक पार्कच्या डायरेक्टर बोर्डावरही होत्या, असे म्हटलेले आहे.

आक्राईव्ह लिंक

एबीपी माझानेच एक मार्च 2018 रोजी याबाबत एक वृत्त दिले आहे. या वृत्तात ही वादग्रस्त जमीन सध्या शरद पवार यांचे निकटवर्तीय अतुल चोरडिया, शाहिद बलवा यांच्या नावे असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील 79 एकर जमीन वादात उदयनराजेंची उडी असे या वृत्ताचे शीर्षक आहे.

आक्राईव्ह लिंक

महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर Tech Park One ही इमारत असलेली जागा कुणाच्या नावावर आहे हे आम्ही जाणून घेतले. हा सात बारा बंद झाला असून याठिकाणी मे टेकपार्क वन हे नाव आम्हाला दिसले.

दिव्य मराठीनेही (आक्राईव्ह लिंक) या जागेबद्दलचे एक वृत्त दिनांक 24 जुलै 2014 रोजी प्रसिध्द केले आहे. एनडीटीव्ही इंडियानेही 2 एप्रिल 2011 रोजी एक वृत्त दिले असून पुणे के समीप एक जमीन घोटाले में फंसे पवार असे म्हटले आहे.  

आक्राईव्ह लिंक

दैनिक ऐक्यने विधानसभेत एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांचे वृत्त 2 एप्रिल 2011 रोजी दिले आहे. या वृत्तात 1735 साली छत्रपती शाहू महाराजांनी येरवडा गावातील जमीन भट व नंतर गोसावी यांना इनाम म्हणून दिली होती, असे म्हटले आहे. एबीपी माझाने एक मार्च 2018 रोजी याबाबत दिलेली माहितीनुसार साताऱ्याच्या शाहू महाराजांनी 1717 मध्ये येरवडा गावातील 3982 एकर जागा शराकती इनाम म्हणून जाधवगीर गणेशगीर गोसावी यांना दिल्याचे म्हटले आहे. गिरीगोसावी यांच्या वंशजांनी खासगी सावकाराकडे ही जमीन गहाण ठेवली आणि 1938 मध्ये या जमिनीचा लिलाव झाल्याचे म्हटले आहे. या जमिनीचा संपूर्ण इतिहास एबीपीने आपल्या वृत्तात दिला आहे.

निष्कर्ष

शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांचे नातलग आणि जवळचे मित्र यांच्या Tech Park One कंपनीने पुण्यात लष्कराची ७० कोटी रुपयांची जमीन केवळ ७ कोटी रुपयांत विकत घेतल्याचा उल्लेख कुठेही आढळले नाही. शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या पंचशील टेक पार्कच्या संचालक मंडळावर होत्या. मात्र त्यांनी लष्कराची जमीन घेतली हे सिध्द होत नाही. ही जमीन शाहू महाराज यांनी गिरीगोसावी यांना दिली होती, असे अनेक ठिकाणी आढळले. त्यांनी ही जमीन लोहिया यांना मिळाली पण संपूर्ण प्रक्रियेत ही जमीन लष्कराची होती, असे कुठेही आढळून आलेले नाही. त्यामुळे हे वृत्त फॅक्ट क्रेसेंडोच्या तथ्य पडताळणीत संमिश्र आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : पवारांच्या नातलगांनी लष्कराची 70 कोटींची जमीन घेतली का?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture