
चीनमध्ये कोरोना व्हायरसने शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातही काही संशयित रुग्ण आढळले आहेत तर केरळमध्ये एकाला याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असतानाच सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ पसरत असून तो कोरोना व्हायरसचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. संजय कुडव यांनीही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ खरंच कोरोना व्हायरसचा आहे का, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
हा व्हिडिओ खरोखरच कोरोना व्हायरसशी संबंधित आहे का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही या व्हिडिओतील एक दृश्य रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी आम्हाला जो परिणाम मिळाला. त्यात युटूयूबवरील 23 ऑक्टोबर 2019 रोजीचा एक व्हिडिओ दिसून आला. या व्हिडिओखालील माहिती पोर्तुगीज भाषेतील असल्याचे गुगलच्या सहाय्याने केलेल्या भाषांतरात दिसून आले. हा बर्न तोंडातून काढतानाचा व्हिडिओ असल्याचे यातून स्पष्ट झाले.
यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडिओ जुना म्हणजेच ऑक्टोबर 2019 मधील आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण हा मध्य चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये सापडला. हा व्हिडिओ व्हायरसची साथ येण्यापूर्वीचा आहे. असाच एक व्हिडिओ 2015 मध्येही व्हायरल झाला होता. डेली मेलने याबाबतचे वृत्त त्यावेळी दिले होते. या वृत्तानुसार एका महिलेच्या ओठातून अशा प्रकारे एक किडा बाहेर काढण्यात आला होता.
डेली मेलमधील सविस्तर वृत्त / Archive
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे कोणत्याही प्रकारचा किडा अशा रितीने शरिरातून बाहेर पडत नाही. ही माहिती असत्य आहे. साधेदुखी, ताप ही सर्वसाधारण लक्षणे या आजारात आढळतात.

निष्कर्ष
समाजमाध्यमात पसरत असलेला हा व्हिडिओ कोरोना व्हायरसशी संबंधित नाही. कोरोना व्हायरसमुळे कोणत्याही प्रकारचा किडा शरीरातून बाहेर पडत नाही. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रदीप आवटे यांनीही याला दुजोरा दिला आहे.

Title:ओठातून किडा काढतानाचा व्हिडिओ कोरोना व्हायरसचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
