तथ्य पडताळणीः दिग्विजय सिंह यांनी खरंच जवानाच्या कानाखाली मारली?

False राजकीय | Political राष्ट्रीय

काँग्रेसचे माजी महासचिव दिग्विजय सिंह त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत असतात. भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये मृत दहशतवाद्यांच्या आकड्यांबाबत पुराव्याची मागणी केल्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

दरम्यान, त्यांच्याविषयी एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात येत आहे की, त्यांनी दिवस-रात्र देशाची सेवा करणाऱ्या जवानाच्या कानशिलात लगावली . फॅक्ट क्रेसेंडो या दाव्याची पडताळणी केली.

सुनिलभाऊ बबनराव डोंगरे यांनी फेसबुकवर 4 मार्च रोजी खालील पोस्ट केली. यामध्ये दिग्विजय सिंह यांनी वर्दीतील एका कर्मचाऱ्याची कॉलर पकडलेली दिसते. इतर यूजर्सनेही अशा पोस्ट अपलोड केलेल्या आहेत.

अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सदरील पोस्टमध्ये दिग्विजय सिंह यांच्याविषयी शिवराळ भाषा वापरलेली आहे. “ज्या दिग्विजय सिंहांनी सैनिकांचा अपमान करून मारले, देशाची रात्रंदिवस सेवा करणाऱ्या जवानाच्या कानाखाली लावली,” असा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. त्याचा पुरावा म्हणून खालील फोटो दिला जातो.

फॅक्ट क्रेसेंडोने गुगलवर – Digvijay Singh Slapping Army Jawan – असे सर्च केले. तेव्हा झी न्यूजची 19 ऑक्टोबर 2015 रोजीची एक बातमी आढळली. या बातमीनुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना विधानसभेत करण्यात आलेल्या अवैध नियुक्ती घोटाळ्यासंदर्भात दिग्विजय सिंह यांची पोलिसांनी भोपाळमध्ये चौकशी केली. चौकशीनंतर पोलिस कंट्रोल रुमच्या बाहेर आल्यावर ते गाडीत बसले. मात्र, त्याच्या समर्थकांवर पोलिस बलाचा वापर करीत असल्याचे दिसताच ते गाडीच्या बाहेर उतरले आणि एका पोलिस कर्मचाऱ्याच्या वर्दीची कॉलर पकडून त्याला बाजूला ढकलले.

विशेष म्हणजे, या बातमीत दिग्विजय सिंह यांनी गैरवर्तन केल्याचे म्हटले आहे. चापट मारल्याचे म्हटलेले नाही.

मूळ बातमी येथे वाचा – झी न्यूजअर्काइव्ह

झी न्यूजच्या बातमीमध्ये राजू परुळेकर यांच्या अधिकृत ट्विटचा दाखला दिला आहे. त्यांनी 18 ऑक्टोबर 2015 रोजी ट्विट दिग्विजय सिंह यांचा हा फोटो शेयर केला होता. काँग्रेस आणि पुरस्कार वापस करणाऱ्या साहित्यिकांवर निशाणा साधत त्यांनी लिहिले की, गर्दीमध्ये जवानाला मारहाण करताना तडफदार नेते दिग्विजय सिंह.

अर्काइव्ह

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत झी न्यूज वगळता इतर कोणत्याही राष्ट्रीय मीडिया वृत्तस्थळावर दिग्विजय सिंह यांनी जवानाला मारहाण केल्याची बातमी आढळून आली नाही. मग आम्ही झी न्यूजच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे गुगलवर  – Recruitment Scam at Madhya Pradesh Assembly Secretariat – असे सर्च केले.

त्यावरून द इकोनॉमिक्स टाईम्सची 15 ऑक्टोबर 2015 रोजीची बातमी आढळली. पीटीआयच्या आधारे दिलेल्या या बातमीत म्हटले की, पाच तास कसून चौकशी झाल्यानंतर दिग्विजय सिंह भोपाळ येथील जहांगीराबाद पोलिस ठाण्याच्या कंट्रोल रुममधून दुपारी 4 वाजता बाहेर पडले. बाहेर पडताना ते शांत होते. त्यांनी मीडिया प्रतिनिधींशीदेखील संवाद साधला नाही.

पोलिस कंट्रोल रुमबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी रस्ता अडवून तत्कालिन मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांचा पुतळादेखील जाळला. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करून दिग्विजय सिंह यांच्या गाडीला रस्ता करून दिला.

या बातमीमध्ये दिग्विजय सिंह यांनी जवानाला चापट मारल्याचा उल्लेख नाही.

मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक्स टाइम्स

फॅक्ट क्रसेंडोने मग युट्यूबवर या घटनेसंबंधी सर्च केले. तेव्हा इंडिया टीव्हीने 15 ऑक्टोबर 2015 रोजी अपलोड केलेला खालील व्हिडियो आढळला. सुमारे तीन मिनिटांच्या या रिपोर्टमध्ये त्या दिवशी चौकशी सुरू असलेल्या कंट्रोल रुमबाहेर दिग्विजय सिंह समर्थकांची गर्दी दिसते. हे कार्यकर्ते गाड्यांवर पडून रस्ता अडवताना दिसतात, तसेच पोलिस त्यांच्यावर लाठीचार्च करत असल्याचेही दिसते. कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटपट होत असताना दिग्विजय सिंह वर्दीतील एका सुरक्षा कर्मचाऱ्याची कॉलर पकडून ढकलताना दिसतात (29 सेंकद).

दिग्विजय सिंह यांची विधानसभेतील पदभरती घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली जात असल्यामुळे नाराज झालेले कार्यकर्ते घोषणाबाजी करताना ऐकू येतात. या व्हिडियोत दिग्विजय सिंह यांनी तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्याची कॉलर पकडली होती. परंतु, त्यांनी कानाखाली चापट मारलेल्याचे दिसत नाही.

तसेच या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, परिस्थितीचा अंदाज पाहून पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी उपस्थित होती. यामध्ये एसपीसह 150 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा होता. त्यामुळे सदरील फोटोमध्ये वर्दीतील कर्मचारी सैन्यातील जवान नसून पोलिस कर्मचारी आहेत. पोलिसांच्या शीघ्र कृती दलातील कर्मचारी अशाप्रकाराचा युनिफॉर्म घालतात. मध्य प्रदेश पोलिसांशी फॅक्ट क्रसेंडोने यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. तसेच वरील सर्व बातम्यांमध्ये ज्याची कॉलर पकडली तो पोलिस कर्मचारी असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष

पडताळणीतून हे स्पष्ट होते की, आपल्या समर्थकांवर पोलिस लाठीचार्ज करत असल्याचे पाहून  दिग्विजय सिंह यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला बाजूला लोटले होते. त्यामुळे त्यांनी सैन्य दलातील जवानाच्या कानाखाली चापट मारल्याचे वृत्त असत्य आहे.

Avatar

Title:तथ्य पडताळणीः दिग्विजय सिंह यांनी खरंच जवानाच्या कानाखाली मारली?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False