
जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जून 2019 रोजी नागपूरमध्ये तापमान 49.64 अंश सेल्सिअसवर पोहचले होते, असा दावा करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
जागतिक पर्यावरण दिनी म्हणजेच 5 जून 2019 रोजी नागपूरमध्ये तापमान काय होते हे शोधण्यासाठी आम्ही नागपूर हवामान विभागाच्या संकेतस्थळास भेट दिली. या संकेतस्थळावर आम्हाला 5 जून 2019 रोजीची हवामानाची माहिती उपलब्ध झाली नाही. महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या संकेतस्थळावरही आम्हाला याबाबतची कोणतीही माहिती दिसून आली नाही. त्यानंतर आम्ही नागपूरमधील स्थानिक दैनिकांमध्ये याबद्दल काही माहिती प्रसिध्द झाली आहे का? याची पडताळणी केली. त्यावेळी आम्हाला नागपूर सकाळने 6 जून 2019 रोजी आपल्या नागपूर आवृत्तीत प्रसिध्द केलेले एक वृत्त दिसून आले. यानुसार नागपूरचे दिनांक 5 जून 2019 रोजीचे तापमान 47.2 अंश सेल्सिअस एवढे होते.
त्यानंतर आम्ही नागपूरचे सर्वाधिक तापमान असे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला नागपूरमधील 2019 मधील सर्वाधिक तापमान 02 जून 2019 रोजी नोंदविण्यात आले असल्याचे दिसून आले. दैनिक लोकमतने हे वृत्त प्रसिध्द केलेले आहे.
आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेत नागपूरचे सर्वाधिक तापमान कधी होते याचा इंग्रजीत शोध घेतला. त्यावेळी आम्हाला द टाईम्स ऑफ इंडियाचे खालील वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार नागपूरचे 22 मे 2013 रोजी सर्वाधिक तापमान हे 47.9 एवढे नोंदवले गेले आहे.
नागपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर असल्याचे आणि उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसिध्द झालेले आहे. नागपूरचे तापमान 49.64 अंश सेल्सिअसवर पोहचल्याचे मात्र दिसून येत नाही.
निष्कर्ष
नागपूर जिल्ह्यात उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहराचे तापमान 5 जून 2019 रोजी 49.64 अंश सेल्सिअस नव्हे तर 47.2 अंश सेल्सिअस होते ही बाब वरील माहितीच्या आधारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत नागपूरचे तापमान 49.64 अंश सेल्सिअसवर पोहचल्याची पोस्ट असत्य आढळली आहे.

Title: Fact Check : नागपूरमध्ये तापमान 49.64 अंश सेल्सिअसवर पोहचले का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
