
चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी करून चिनी झेंडे फडकावले, अशी पोस्ट सनातन प्रभातने आपल्या फेसबुक पेजवर प्रसिध्द केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
चिनी सैनिकांनी लडाखमध्ये घुसखोरी केली होती का हे शोधण्यासाठी गुगलवर लडाखमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी असा शब्दप्रयोग केला. त्यावेळी आम्हाला खालील परिणाम मिळाला.
या परिणामात आम्हाला एबीपी माझा या वृत्तवाहिनीने चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे वृत्त दिसून आले. त्यानंतर आम्हाला महाराष्ट्र टाईम्सचे चीनची लडाखमध्ये ६ किमीपर्यंत घुसखोरी? हे वृत्त दिसून आले. या वृत्तात चीनी सैन्याने लडाखमधील डेमचोक भागात ६ किमीपर्यंत घुसखोरी करत आपला ध्वज फडकवला असल्याचा दावा स्थानिकांनी केल्याचे म्हटले आहे. चीनी सैन्य वाहनांमधून भारताच्या हद्दीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी चीनचा ध्वज फडकवला. चीनी सैन्याने केलेल्या या घुसखोरीचा काही वेगळाच हेतू असल्याची शंका डेमचोकचे सरपंच उरगेन चोदोन यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकांकडून दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यात होता. त्यावेळी चीनी सैन्याने घुसखोरी केली. चीनने केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब असल्याचे उरगेन यांनी सांगितले, असे वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी चीनच्या घुसखोरीचा दावा फेटाळून लावला आहे. चीनने सिंधू नदीच्या पलीकडून त्यांचा बॅनर झळकावला. हा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली येत असल्याचेही या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत केलेले ट्विट आपण खाली पाहू शकता.
दिव्य मराठीच्या संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त देताना वृत्तसंस्थाच्या हवाल्याने लडाखमध्ये चिनी सैन्याने घुसखोरी केली नव्हती, असे लष्करप्रमुख रावत म्हणाल्याचे वृत्त दिले आहे.
निष्कर्ष
चीनचे सैन्य डेमचोक भागात भारताच्या हद्दीत नव्हे तर त्यांच्याच हद्दीत होते असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. चिनी सैन्याने घुसखोरी केल्याचे वृत्त लष्कराने फेटाळून लावले आहे. दलाई लामा यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी स्थानिक जमले होते. ते नक्की काय करत आहेत, याची पाहणी करुन चिनी सैन्य तेथून परतले. त्यामुळे चीनी सैन्याने डेमचोक भागात भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याची पोस्ट फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणी असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : चीनच्या सैनिकांनी लडाखमध्ये भारतीय ह्ददीत घुसखोरी करत झेंडे फडकवले?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
