व्हायरल व्हिडिओमधील मुलगा बहिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची हत्या करणारा लवप्रीत नाही; वाचा सत्य
पंजाबमध्ये एका भावाने त्याच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची गेल्या महिन्यात हत्या केली. लवप्रीत असे या भावाचे नाव आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका तरुणाला न्यायालयात हजर करतानाचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बहिण्याच्या बलात्काराचा बदला घेणाऱ्या लवप्रीतचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील मुलगा लवप्रीत नाही. दिल्लीमधील एका वेगळ्याचा तरुणाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये न्यायालयात एका मुलाला पोलिस घेऊन जाताना तो मुलगा हसत-हसत जातो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “28 ऑगस्ट च्या रात्री विशनपुरा जट्टा गावात ओंकार सिंह नाव असलेल्या मुलाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी खुलासा करताना सांगितलं की 2015 मधे ओंकार सिंह ने एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार केला होता त्यामुळे त्याला दहा वर्षाची शिक्षा पण झाली,पुढे कोरोना काळात त्याची शिक्षा कमी करण्यात आली आणि त्याला सोडण्यात आलं. घटना झाल्यावर पुढे काही दिवसांनी त्या बिचाऱ्या मुलीचा मृत्यू झाला आणि हा धक्का सहन न झाल्यामुळे तिचे बाबा सुद्धा हे जग सोडून गेले. ह्या गोष्टीचा राग आणि दुःख मुलीचा भाऊ लवप्रीत सिंह ह्याच्या मनात होताच पण तेव्हा तो फक्त दहा वर्षाचा होता. 28 ऑगस्ट च्या रात्री वेळ साधून लवप्रीत ने धारदार शस्त्राने ओंकार सिंह चा वध केला. त्याला अटक झाल्यावरचा हा व्हिडिओ आहे जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आल तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर विजयी भाव आणि बहिणीचा बदला घेतल्याचा आनंद साफ दिसतोय.”
नवभारत टाईम्सनेदेखील आपल्या लेखात व्हायरल व्हिडिओमधील मुलाला लवप्रीत सांगितले आहे.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
हिंदूस्तान टाईम्सने 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार पंजाबच्या कपूरथला जिल्ह्यातील मजहादपूर गावमधील लवप्रीत नामक युवकाने 28 ऑगस्ट रोजी ओंकार सिंग (रा. बिशनपूर जट्टन) नामक व्यक्तीची धारदार शस्त्रांनी हत्या केली होती.
मृत ओंकार सिंगने लवप्रीतच्या अल्पवयीन बहिणीवर नऊ वर्षांपूर्वी बलात्कार केला होता. या घटनेनंतर बलात्कार पीडितेचा काही महिन्यांनंतर मृत्यू झाला. ओंकार सिंग 10 वर्षांशी शिक्षा झाली होती. कोरोना काळात त्याची सुटका झाल्यावर लवप्रीतने मित्रांसोबत मिळून ओंकार सिंगची हत्या केली.
कपूरथला पोलीसांनी 30 ऑगस्ट रोजी या घटनेसंबंधित संपूर्ण माहिती ट्विटरवर शेअर केली होती. वरिष्ठ पोलीस अधीक्षक वत्सला गुप्ता यांनी महिती दिली की, “लवप्रीत आणि त्याच्या मित्राला 30 ऑगस्ट रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले.”
मग व्हायरल व्हिडिओमधील मुलगा कोण ?
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हिडिओमधील मुलगा दिल्लीचा रहिवासी असून आदू डिफोल्टरच्या नावाने त्याचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे.
या अकाउंटवरून व्हायरल व्हिडिओ 10 एप्रिल रोजी शेअर करण्यात आला होता.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तसेच या आकाउंटवर न्यायालयातून या तरुणाला पोलिस कर्मचारी घेऊन जातानाचे अनेक व्हिडिओ आहेत.
अर्थात हा व्हिडिओ ओंकार सिंगच्या हत्येच्या 5 महिन्यांपूर्वीपासून सोशल मिडियावर उपलब्ध आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील मुलगा लवप्रीत नाही. ओंकार सिंगच्या हत्येच्या 5 महिन्यांपूर्वीपासून हा व्हिडिओ सोशल मिडियावर उपलब्ध आहे. भ्रामक दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)