
*डेंगू चा ताप सगळीकडे पसरत आहे. आपल्या गुडघ्यापासून पायाच्या पंज्या पर्यंत खोबरे तेल ( coconut oil ) लावा. हे सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत एक एंटीबायोटिक चं काम करतं. डेंगूचा मच्छर गुडघ्या पेक्षा उंच उडू शकत नाही.* सौजन्य :- महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, अशी माहिती Ds Moon यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या नावाने हा मेसेज पसरविला जात असल्याने आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन याबाबतची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या संकेतस्थळावर आम्हाला अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. डेंग्यूपासून कसा बचाव करावा याची खालील माहिती आढळून आली.
आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरील माहिती
विकीपीडियावर डेंग्यूविषयी असलेल्या माहितीतही असा कोणताच उपाय दिसून येत नाही. ऑडिओ स्वरुपातील माहितीही याठिकाणी दिसून येते. सेंटर फॉर डिजिज कंट्रोल and प्रव्हेंन्शनने डेंग्यू पसरण्याची वेगवेगळी कारणे व तो कसा पसरु शकतो याची माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबद्दल माहिती दिली आहे. डेग्यूचा डास हा 400 मीटर उंचीपर्यंत उडू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या माहितीत म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यू डासाविषयी दिलेली माहिती
डेंग्यूच्या डासाविषयी देण्यात आलेल्या माहितीनुसार आपल्याला दिसून येते की डेग्यूचा डास हा गुडघ्याच्या वरच्या भागातही चावू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यू रोखण्यासाठी काय करता येऊ शकते, याची माहिती दिली आहे. या माहितीतही खोबरे तेलाने डेंग्यू रोखता येऊ शकतो, असे म्हटलेले नाही.
दरम्यान या व्हायरल मेसेजची सत्यता तपासण्यासाठी आम्ही आयुर्वेदाचार्य डॉ. अनिल वर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खोबरे तेल असं काही काम करत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच डास गुडघ्यापेक्षा अधिक उंचीपर्यंत उडू शकता. तो शरीराच्या कोणत्याही भागाला चावा घेऊ शकतो, असे सांगितले. त्यामुळे त्वचेचा जास्तीत जास्त भाग झाकलेला असणे आणि डासाच्या चाव्यापासून बचाव करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
निष्कर्ष
खोबरे तेलाच्या वापराने डेंग्यूचा डास चावत नाही, हे असत्य असल्याचे आमच्या तथ्य पडताळणीत आढळले आहे. डास शरीराच्या कोणत्याही भागाला चावा घेऊ शकतो. त्यामुळे शरीराचा जास्तीत जास्त भाग झाकलेला असणे, गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : काय खोबरे तेल तुमचा डेंग्यूपासून बचाव करते?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
