
श्री संत गजानन महाराजांना माननारे लाखो भक्त महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर आहेत. श्री संत गजानन महाराजांचे म्हणून सध्या काही छायाचित्रे समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशीच काही छायाचित्रे Jagdish Khardekar यांनी पोस्ट केली आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
तथ्य पडताळणी
श्रीक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराजांचे ही छायाचित्रे आहेत का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही ही छायाचित्रे रिव्हर्स इमेजने शोधली. त्यावेळी आम्हाला एके ठिकाणी हे भालचंद्र महाराज असल्याचा दावा आम्हाला दिसून आला. त्यानंतर आम्ही हे भालचंद्र महाराज आहेत का, हे जाणून घेण्यासाठी कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या संकेतस्थळास भेट दिली. त्यावेळी आम्हाला संस्थानच्या संकेतस्थळावर भालचंद्र महाराजांचे खालील छायाचित्रे दिसून आली.
परमहंस भालचंद्र महाराज संस्थान संकेतस्थळ / Archive
आपण खाली दोन्ही छायाचित्रे तुलनात्मकरित्या पाहू शकता.
परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या संकेतस्थळावर आपण भालचंद्र महाराजांची आणखी छायाचित्रे पाहू शकता. त्यानंतर आम्ही श्रीक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराज संस्थानच्या संकेतस्थळासही भेट दिली. याठिकाणीही आम्हाला गजानन महाराज यांची अशी कोणतीही छायाचित्रे दिसून आली नाहीत. याबाबत आम्ही परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांच्याची संपर्क साधला. त्यांना व्हायरल होत असलेली ही छायाचित्रे पाठवली. त्यांनी ही छायाचित्रे पाहून हे स्पष्ट केले की ही भालचंद्र महाराजांचीच छायाचित्रे असून ती भक्तांच्या संग्रहातील आहेत.
निष्कर्ष
श्रीक्षेत्र शेगांव येथील गजानन महाराजांचे म्हणून कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराजांची छायाचित्रे पसरविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर यांनी स्वत:ची ही भालचंद्र महाराजांची छायाचित्रे असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : भालचंद्र महाराजांची छायाचित्रे गजानन महाराजांची म्हणून होत आहेत व्हायरल
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
