हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे.

False सामाजिक

जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून रस्ते बंद होण्याच्या घटना पावसाळ्यात घडत असतात. सोशल मीडियावर अशा घटनांचे फोटो लगेच व्हायरल होतात. परंतु, फोटोंची शहानिशा न करता ते पसरविणे धोक्याचे ठरू शकते. सध्या असाच एक चुकीचा फोटो मोठ्या प्रमाणात पसरविला जात आहे.

प्रतिष्ठत वृत्तसंस्था ANI ने 6 ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यावर मोठी भेग पडल्याचा एक फोटो ट्विट केला. सोबत लिहिले की, हा फोटो कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील आहे. तेथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर तुफान पावसामुळे हा अशा भेगा पडल्याचे एएनआयने माहिती दिली.

मूळ ट्विट येथे पाहा – ANI | Archive

अनेक राष्ट्रीय वृत्तवेबसाईट्सने हा फोटो वापरला. आज तक, आयबी टाईम्स, टाईम्स नाऊ, मिरर नाऊ यासह अनेक चॅनेल आणि दैनिकांनी हा फोटो वापरून बातम्या दिल्या, पुणे-बंगळुरू महामार्गावर (NH-4) निप्पाणी येथे रस्ता खचून मोठमोठ्या भेगा पडल्या. 

मग प्रॉब्लेम काय आहे?

ANI च्या ट्विटखाली अनेक युजर्सने कमेंट्स केल्या की, हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील नाही तर, मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोने दाव्याची सत्य पडताळणी केली. 

तथ्य पडताळणी

कसारा घाटाचा उल्लेख आणि सदरील फोटोत मागे भिंतीवर दिसणारे GREEN LAND PURE VEG या हॉटेलची जाहिरात हा धागा पकडून शोध घेतला. कसारा घाटापासून जवळ असणाऱ्या तळेगाव येथील ग्रीन लँड हॉटेलचे फतेहअली चौधरी यांच्याशी फॅक्ट क्रेसेंडोने संपर्क साधला. त्यांनी हा फोटो जुन्या कसारा घाटातील रस्त्याचा असल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून कसार घाटात रस्ता खचून भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी काही दिवस बंद करण्यात आला होता असे त्यांनी सांगितले.

मग आम्ही इगतपुरी पोलीस आणि महामार्ग पोलीस (नाशिक) यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीसुद्धा हा फोटो कसारा घाटातील असल्याचे सांगितले. तसेच ही जागा कसारा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्याचे सांगितले. त्यानुसार कसारा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता कळाले की, या फोटोत दिसणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव पोलीस उपनिरीक्षक मधुकर माऊळे आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोने थेट श्री. माऊळे यांच्याशीच संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदरील फोटोत तेच आहेत. त्यांनी माहिती दिली की, मुंबईकडून नाशिककडे येताना जुना कसारा घाट मार्ग सुरू झाल्यावर दीड-दोन किमी अंतरावर ही जागा आहे. 4 ऑगस्ट रोजी ते घाटावर पाहणी करण्यासाठी गेलेले असताना हा फोटो काढला होता. आता ही भेग भरली आहे.

हा फोटो कोणी काढला होता असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, त्यावेळी अनेक लोक तेथे उपस्थित होते. त्यांच्यापैकीच कोणी तरी काढला असावा.

विशेष म्हणजे अनेक मराठी दैनिक व चॅनेलनी ही बातमी दाखवली होती. महाराष्ट्र टाईम्सच्या बातमुमीनुसार, मुसळधार पावसामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटातील मार्गावर रस्ता खचला होता. रस्त्यावर ठिकठिकाणी भेगा पडल्याने या मार्गावर काही काळ एकेरी मार्गावरून वाहतूक धावत होती. मात्र,  नंतर दुरुस्ती कामासाठी या मार्गावरची वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली. ही वाहतूक नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या नव्या घाटमार्गावरून सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले. 

झी न्यूज हिंदीने हे फोटो वापरून कसारा घाटातील वाहतूकीची बातमी केली होती. या रस्त्यावर पोलीस तैनात असून वाहतूकीला सुरळीत ठेवण्याचे काम करीत आहेत. एबीपी माझानेसुद्दा याच्यावर टीव्ही रिपोर्ट केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष

ANI ने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील भेगाळलेल्या रस्त्याचा म्हणून दिलेला फोटो मूळात कसारा घाटातील आहे. फोटोत दिसणाऱ्या पीएसआय मधुकर माऊळे यांनी स्वतः फॅक्ट क्रेसेंडोला ही माहिती दिली.

Avatar

Title:हा फोटो बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील रस्त्याचा नाही. तो कसारा घाटातील आहे.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False