नरेंद्र मोदींनी एकाच रेल्वेचे दोन वेळेस उद्घाटन केले नाही; चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच गुजरात दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी एका रेल्वेचे उद्धघाटनदेखील केले. या कार्यक्रमानंतर सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, मोदी यांनी 2019 मध्ये ज्या रेल्वेचे उद्घाटन केले होते त्याच रेल्वेचे दोन वर्षांनी पुन्हा उद्घाटन केले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन (9049053770) क्रमांकावर पाठवून या दाव्याची सत्यता विचारली.

पडताळणीअंती कळाले की, हा दावा चूकीचा आहे. व्हायरल पोस्टमध्ये दिसणाऱ्या दोन्ही रेल्वे वेगळ्या आहेत. 

काय आहे दावा?

व्हायरल पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करत असतानाचे दोन फोटो शेअर केलेले आहेत. सोबत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकाच ट्रेनचे दोन वेळेस उद्धाटन केले.’’ 

मूळ पोस्ट – ट्विटर

तथ्य पडताळणी

व्हायरल पोस्टमध्ये दोन फोटो दिलेले आहेत. एक-एक करीत दोन्हींची माहिती घेऊया.

फोटो क्र. 1

फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, पहिला फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 साली अहमदाबाद येथे मेट्रो रेल्वेच्या केलेल्या उद्धाटनचा आहे. 

डेक्कन हेराल्डच्या बातमी नुसार, 4 मार्च 2019 रोजी नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. यावेळी मेट्रोतून प्रवासदेखील केला होता. भाजप गुजरातनेदेखील या उद्घाटन समारोहाचे फोटो शेअर केले होते.

मूळ बातमी – डेक्कन हेराल्ड

फोटो क्र. 2

दुसऱ्या फोटोलासुद्ध रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी गांधीगनगर येथे वंदे भारत रेल्वेच्या केलेल्या उद्घाटनाचा आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवरून 30 सप्टेंबर रोजी सदरील फोटो शेअर केलेला आहे. यावेळी पंतप्रधानांनी महिला स्वयंउद्योजिका, प्रतिभावान तरुण आणि रेल्वे कार्यात सहभागी कर्मचाऱ्यांसोबत प्रवास केला. एनडीटीव्हीने या उद्घाटनाचा व्हिडिओ त्यांच्या युट्यूबवर शेअर केलेला आहे.

वृत्तसंस्था ANI ने देखील हा फोटो शेअर केलेला आहे. सोबत लिहिले की, नरेंद्र मोदींनी गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत नामक रेल्वेचे उद्घाटन केले.

मेट्रो आणि वंदे भारत रेल्वे एकच नाही

अहमदाबादमधील मेट्रो आणि गांधीनगर येथून सुरू झालेली वंदे भारत रेल्वे हे दोन्ही वेगवेगळे प्रकल्प आहेत. 

वंदे भारत एक्सप्रेस ही 16 डब्यांची मध्यम द्रुतगती (सेमी हाय-स्पीड) रेल्वे आहे. आतापर्यंत केवळ दिल्ली ते वैष्णोदेवी, दिल्ली ते वाराणसी आणि गांधीनगर ते मुंबई अशा केवळ तीन मार्गांवर ही रेल्वे सुरू आहे.

अहमदाबाद मेट्रो प्रकल्प हा केवळ अहमदाबाद व गांधीनगर या शहरांपुरता मर्यादित आहे. आतापरर्यंत या प्रकल्पाचे दोन टप्पे पूर्ण झालेले आहेत. 

निष्कर्ष

या वरून स्पष्ट होते की, व्हायरल पोस्टमधील दोन्ही फोटोतील रेल्वे एकच नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी एकाच रेल्वेचे दोनदा उद्घघाटन केले, हा दावा चुकीचा ठरतो. पंतप्रधानांनी 2019 मध्ये अहमदाबाद मेट्रोचे तर, 2022 मध्ये वंदे भारत रेल्वेचे उद्घघाटन केले होते. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:नरेंद्र मोदींनी एकाच रेल्वेचे दोन वेळेस उद्घाटन केले नाही; चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल

Fact Check By: Factcrescendo Team 

Result: False